Sat, Mar 23, 2019 02:14होमपेज › Satara › ‘कोण म्हणेल आम्हाला... चालती हो घराबाहेर’

‘कोण म्हणेल आम्हाला... चालती हो घराबाहेर’

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 10:58PMखेड : अजय कदम

पती-पत्नीचे भांडण झाले तर नेहमीप्रमाणे पुरुषी अहंकार जागा होतो आणि त्या अबलेच्या कानावर एक वाक्य पडते ते म्हणजे... ‘चल चालती हो घराबाहेर... जा तुझ्या बापाच्या घरी...!’ पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर हे संवाद नेहमी ऐकायला येतात. अनेकदा हे प्रकार मारहाण अथवा त्याच्याही पुढे जातात. सातारा जिल्ह्यातील अनेक गावातील महिलांना मात्र ‘चालती हो घराबाहेर’ असे म्हणण्याचे धाडस आता कोणी करणार नाही. कारण जिल्ह्यातील गावागांवामध्ये संयुक्‍त घरमालकी मोहीम राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यात येत आहे. 

महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमत्तेत हक्‍क देणे मूलभूत गरज असल्याचे अनेकदा मांडण्यात आले आहे. पती-पत्नी एकरुप घटक मानले गेल्याने प्राप्‍त संपत्तीही दोघांची मानली जाते. मात्र, अनेकदा पती निधनानंतर पतीच्या मालमत्तेत हक्‍क प्रस्थापित करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी अगोदरच महसुली दप्‍तरी जर पती-पत्नीचे नाव असेल तर यासारख्या अडचणी येणार नाहीत. अगदी बोलायचेच झाले तर मालमत्तेवर पुरुषाचाच हक्‍क राहिल्याने कर्तबगारी दाखवूनही महिलांना दुय्यम स्थान मिळाले. घरातील भाड्यांवरील नावे पाहिली तरी आजही त्यावर अनेक पुरुषांचीच नावे असतात.

घराची नोंद जर पती-पत्नी दोघांच्या नावे असली तर आपोआपच स्त्रियांना सन्मान वाढण्यास मदत होणार असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्रालयाने दि. 20 नोव्हेंबर 2003 ला पती-पत्नीच्या संयुक्‍त नावे घर करण्यासंबंधीचा अध्यादेश काढला आणि त्याला संयुक्‍त घरमालकी मोहीम असे नाव दिले. यास अनुसरुन ग्रामपंचायतींनी घराच्या नोंदी फॉर्म आठ ‘अ’मध्ये पती-पत्नीच्या नावे संयुक्‍त नावाने कराव्यात आणि याची अंमलबाजावणी तत्काळ करण्यात यावी, असे आदेश दिले. मात्र याची अमंलबजावणी नीट होत नव्हती.

महिलांचा सर्व स्तरावरील निर्णय प्रक्रियेत सहभाग वेगाने वाढवायचा असेल तर राहते घर पती-पत्नी दोघांच्या मालकीचे हवे. यासाठी महिला राजसत्ता आंदोलन समितीच्या वतीने यासाठी जिल्ह्यात महिलांमध्ये जनजागृती, स्वतंत्र महिला ग्रामसभा घेणे आणि ग्रामसभेत पुरुषांची मानसिकता बदलणे आदि बाबींवर भर दिला. या मोहिमेमुळे गावोगावी आदिशक्‍तीला सन्मान मिळत  आहे. अजूनही काही गावांमध्ये या मोहिमेला म्हणावे तितकेसे बळ मिळाले नसले तरी कार्यवाहीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तर बहुतांशी गावांमध्ये घराच्या दारावर पती-पत्नीचे नाव असणार्‍या  पाट्या झळकू लागल्या आहेत.