Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Satara › मराठा आंदोलनात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

मराठा आंदोलनात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 10:47PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण तालुक्याच्या राजकारणातील गटबाजी जगजाहीर आहेच. विषय कोणताही असो त्याला राजकीय वास असतोच. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात एका बाजुला मान्यवरांच्या बहुरंगी टोप्यांची  चर्चा सुरू असताना ठिय्या आंदोलनातील भजनात मात्र दोन्ही गटांचे कार्यकर्ते सुरात सुर मिळवत दंग होते. आंदोलकांच्या डोक्यावर छत असलेल्या मंडपाचे  तर पावसाचा फटका बसू नये म्हणून मंडपावरील पत्र्याचे सौजन्य वेगवेगळ्या मान्यवरांनी दाखवत हे आंदोलन यशस्वी केले. 

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळण्यासाठी पाटण येथे सध्या समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. सकल मराठा समन्वय समितीच्या आयोजनाखाली राजकीय पक्ष, गट, संघटनांच्या पलिकडे जाऊन हे आंदोलन सुरू आहे. तर यात मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचाही बहुमोल सहभाग आहे. निश्‍चितच एका छत्राखाली हा सकल मराठा समाज एकत्रीत येत आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे यात अंतर्गत दुफळी, मत अथवा मनभेद याची दृष्ट लागू नये याची खबरदारी ही समिती घेत आहे. मात्र तरीही काही मंडळींच्या आतातायी पणामुळे अशा आंदोलनाना खिळ बसू शकते किंवा त्यातील गांभीर्य व धगही कमी होते.

त्यामुळे राजकारण विरहित हे आंदोलन यशस्वी व्हावे असे सार्वत्रिक प्रयत्न सुरू आहेत. याचाच नमुना येथील भजन, कीर्तन ते डोक्यावरील छतातूनही पहायला मिळत आहे मात्र याकडे संबंधितांनी डोळसपणे पहाण्याची गरज आहे. किर्तनाचे साहित्य कोणाचे याहीपेक्षा त्याच साहित्यावर पाटणकर, देसाई गटाच्या समर्थकांचा जुळलेला सुर आणि डोक्यावरील मंडप अथवा पत्रा कोणाचा हे तपासण्यापेक्षा नेहमीच राजकीय विरोधी मते असणारा मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने एकाच छताखाली एकाच उद्देशाने जमलेला हा मराठा समाज याकडे सामाजिक नजरेने पाहिले तर निश्‍चितच यातील उद्दिष्ट पूर्ण होईल आणि सकल  मराठा एकत्र आला याचा सखोल विचारही रूजला जाईल हे निश्‍चित.