Sat, Apr 20, 2019 10:14होमपेज › Satara › प्लास्टिक पिशव्या जमा करा अन्यथा कारवाई

प्लास्टिक पिशव्या जमा करा अन्यथा कारवाई

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 1:22AMकराड : प्रतिनिधी

शासनाने लागू केलेल्या  प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे करण्यात येणार आहे. व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे असणार्‍या प्लास्टिक पिशव्या नगरपालिकेकडे जमा कराव्यात,  अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची कारवाई करण्याची वेळ येवू देऊ नका, अशा सूचना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केल्या. 

येथील नगरपालिका सभागृहामध्ये प्लास्टिक बंदी बाबत केलेल्या कायद्याची माहिती देण्यासाठी  व याबाबत व्यापार्‍यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आयोजित शहरातील विविध व्यापार्‍यांच्या बैठकीत डांगे यांनी प्लास्टिक बंदीबाबत व्यापार्‍यांना सहकार्याची भूमिका पार पाडावी असे आवाहन केले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव, महिला व बालकल्याण सभापती आशा 

मुळे, नगरसेवक विजय  वाटेगावकर, सौरभ पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, विनायक पावसकर, विद्या पावसकर, ग्रिनी द ग्रेटचे अमोल गायकवाड, मिलिंद शिंदे यांची उपस्थिती होती. यशवंत डांगे यांनी प्लास्टिक मुळे होणार्‍या दुष्परिणामांंची माहिती दिली. यासाठी पर्यायी कापडी पिशव्या वापरण्याबाबतच्या सूचना दिल्या.  तसेच 2006 पासून शासनाने वेळोवेळी  या बंदीबाबत माहिती दिली आहे, असे सांगितले.

यावेळी काही व्यापार्‍यांनी यापूर्वी आमच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्याबाबत काय करायचे असे सांगून त्याबाबत काही दिवसांची सवलत मिळावी अशी मागणी केली यावर मुख्याधिकारी यांनी शासनाचे नियम व कायदा पाळणे बंधनकारक असून ज्या व्यापार्‍यांकडे प्लास्टिक पिशव्या, कॅरिबॅग शिल्‍लक आहेत त्यांनी त्वरीत त्या पिशव्या जमा कराव्यात अन्यथा दंडाची कारवाई करावी लागेल असे सांगितले. शासनाकडून आमच्याकडे अंमलबजावणीची माहिती मागविण्यात येत आहे. त्यामुळे  कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे असून या प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्यायी कापडी पिशव्या वापराव्यात असे सांगितले. यावर व्यापार्‍यांनी आम्ही नियम पाळण्यास तयार आहोत मात्र यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी आरोग्यदायी जीवनासाठी प्लास्टिकमुक्‍ती करण्याचे आवाहन केले. 

विजय वाटेगावकर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे देशाची वाटचाल स्वच्छतेकडे असून प्लॅस्टिक मुक्‍तीचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापार्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विनायक पावसकर यांनी सर्व व्यापार्‍यांना या बंदीची माहिती होण्यासाठी शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्र उभारावीत असे सांगून सर्वत्र फलक लावावेत अशा सूचना केल्या. 

पुढील मंगळवारी पुन्हा होणार बैठक

शहरातील व्यापार्‍यांकडे यापूर्वी मालाबरोबर ज्या प्लास्टिक पिशव्या मिळाल्या आहेत किंवा काही व्यापार्‍यांनी स्वत:च्या दुकानाच्या नावे हजारांच्यावर पिशव्या छापून घेतल्या आहेत त्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे व्यापार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच बेकरी माल उत्पादनाचे मोठे नुकसान होणार आहे. खारी,बिस्किटे, टोस्ट प्लॅस्टिकमध्ये मऊ होत नाहीत मात्र बाहेर ठेवल्यास मऊ होतात त्यामुळे ग्राहक असा माल घेणार नाही त्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचेही निदर्शनास आणले यावर मुख्याधिकारी यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा शिक्‍का असलेले प्लास्टिक पिशव्या वापरण्याबाबत सांगितले तसेच यासाठी पुढील मंगळवारी व्यापार्‍यांना प्रदूषण बोर्डाचे अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.