होमपेज › Satara › रिपीटर ट्यूशन फी बंद करा; अन्यथा आंदोलन 

रिपीटर ट्यूशन फी बंद करा; अन्यथा आंदोलन 

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 8:13PMसातारा : प्रतिनिधी

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात या ना त्या कारणाने विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवण्याबाबत आरोग्य मंत्री तथा शासनाने तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. दि. 20 एप्रिलपर्यंत रिपीटर ट्युशन फी रद्द करण्याबाबत काही निर्णय न झाल्यास  मंत्रालयाबाहेेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  वैद्यकीय अन्याय निवारण समितीच्यावतीने निवेदनाव्दारे  देण्यात आला.

आरोग्य मंत्र्यांकडे यासंदर्भात निवेदन देवून वैद्यकीय विद्यार्थ्यांची होणारी नाडवणूक व वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्याची मंत्रीमहोदयांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. रिपीटर टयूशन फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होत आहे. फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जातो. ओरल परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली जाते. या फीच्या पक्क्या पावत्याही दिल्या जात नाहीत.  याबाबत विचारले असता कॉलेज प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. 

फी भरुनही ट्यूशनही घेतल्या जात  नाहीत. विद्यार्थी स्वत: अभ्यास करुन फेल विषयांच्या परीक्षा देत असतील तर महाविद्यालयांनी ट्यूशन फी का घ्यावी? असा सवाल विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या जी.आर.नुसार अशी कोणतीही फी  घेता येत नसतानाही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून ट्यूशन फी उकळत आहेत. फी न भरल्यास परीक्षा फॉर्म भरु दिले जात नाहीत.   मुदत संपूनसुध्दा केवळ ट्युशन फी भरली नसल्याच्या कारणास्तव महाविद्यालयांनी  विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले नसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन व आरोग्य मंत्र्यांनी 20 एप्रिलपर्यंत सर्व खाजगी महाविद्यालयातील  विविध शाखांच्या विद्यार्थ्यांची रिपीटर ट्युशन फी तात्काळ रद्द न केल्यास  संबंधत महाविद्यालयांना टाळे ठोकून मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.

Tags : Satara, Close, repeater, tuition fee, Otherwise, movement