Tue, Mar 19, 2019 09:46होमपेज › Satara › बलात्कार करून बनवली क्‍लिप; संशयिताला कोठडी

बलात्कार करून बनवली क्‍लिप; संशयिताला कोठडी

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 11:36PMसातारा : प्रतिनिधी

बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप बनवून युवतीच्या विवाहानंतर 10 लाख रुपये मागत ब्लॅकमेल करणार्‍या अशोक तुळशीदास यादव (रा. खिंडवाडी, ता. सातारा) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सातार्‍यात खळबळ उडाली आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला विवाहिता आहे. 2008 मध्ये संबंधित महिला सातारा एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामाला होती. संशयित हा त्या कंपनीमध्ये सीनिअर क्‍वालिटी कंट्रोल ऑफिसर होता. संशयित अशोक यादव त्या महिलेला वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अशोक यादव हा वारंवार तिचा पाठलाग करून दुचाकीवरून लिफ्ट देण्याचा बहाणा करत होता. अशातच त्याने लग्‍नाचीही मागणी घातली. वारंवार पाठलाग होत असल्याने अखेर तक्रारदार महिलेने भावाला याबाबतची माहिती देऊन ते दोघे संशयित अशोक यादव याला भेटले. दोघांनी भेटून लग्‍नासाठी नकार दिला व पुन्हा त्रास देऊ नको, असेही बजावले. या घटनेनंतर त्याने चूक झाल्याचे मान्य केले. पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली.

संशयित अशोक यादव हा त्यानंतर महिलेला आपण मित्र राहू असे म्हणून पुन्हा पाठलाग करुन त्रास देवू लागला. या त्रासामुळे महिलेने त्या कंपनीचा राजीनामा दिला व दुसरी कंपनी जॉईन केली. संशयिताने तक्रारदार महिलेची सर्व माहिती घेतली व 2010 मध्ये घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग केला. हे कृत्य करताना त्याने मोबाईलवर व्हिडीओ शुटींगही केले. संशयिताने ‘तु जर ही बाब कोणाला सांगितली तर हे व्हिडीओ शुटींग व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली.

व्हिडीओ शुटींग असल्याचे सांगत त्याने वेळोवेळी ठिकठिकाणी बलात्कार केला. याच दरम्यान, संशयिताने लग्न केले मात्र त्याचे ते लग्न फार काळ टिकले नाही. या घटनेनंतरही तो वेळोवेळी ब्लॅकमेल करुन बलात्कार करत होता. तक्रारदार महिलेने या कृत्यापासून सुटका करण्याची विनंती केली. या त्रासातून सुटका होण्यासाठी महिलेनेही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र जे स्थळ येत होते त्यांना संशयित दोघांमध्ये संबंध असल्याचे सांगून तो विवाह मोडत होता. असे तक्रारदार महिलेचे सुमारे चार विवाह त्याने मोडले आहेत.

संशयिताने तो जेव्हा बोलावेल तेव्हा त्याला वेळ देण्याच्या अटीवर महिलेला विवाह करण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने मे 2018 मध्ये विवाह केला. विवाह झाल्यानंतर आठ दिवसातच अशोक यादव याने 10 लाख रुपयांची मागणी केली अन्यथा, तो व्हिडीओ पतीला पाठवणार असल्याची धमकी व्हॉटसअप मेसेज करुन दिली. या सर्व त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताला अटक केली असून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.