Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Satara › स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याची पीछेहाट

स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्याची पीछेहाट

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 8:58PMसातारा : महेंद्र खंदारे

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्व्हेक्षणमध्ये जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्‍वर व पाचगणी पालिका वगळता  इतर कोणत्याच नगरपालिकेने ठसा उमटवला नसून या स्पर्धेबाबत गांभीर्य घेतले गेलेले दिसत नाही. फक्त प्रसारासाठी आलेल्या निधीचे फ्लेक्स लावणे व रंगरंगोटी करणे या व्यतिरिक्त काहीही केले नाही. स्वच्छतेमध्ये कृती महत्वाची असते मात्र इथे फक्त कागदोपत्री स्वच्छता केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये पीछेहाट झाली आहे.

केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धा राबवली आहे. यामध्ये 4 हजार 41 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील रहिमतपूर, वाई, कराड, फलटण, महाबळेश्‍वर, पाचगणी, म्हसवड या नगरपालिकांचा समावेश आहे. या स्पर्धेत टॉप 20 आणि टॉप 10 नंबर काढले जाणार आहेत. सुमारे 5 ते 20 कोटी रूपयांचे बक्षीस नंबर मिळालेल्या नगरपालिकेला मिळणार आहे. केंद्राची जरी ही स्पर्धा असली तरी महाराष्ट्रातीलच नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये चुरस लागली आहे.

ज्या शहरांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्या प्रत्येक शहरांमध्ये केंद्राचे प्रतिनिधी जाऊन पाहणी करत आहेत. या पाहणीत स्वच्छता, नाले सफाई, घंटागाडीचे नियमन, कचरा वर्गीकरण, कचर्‍याचे विघटन करून अन्य पदार्थ बनवणे यासह अन्य बाबींचा विचार करण्यात येत आहे. 

ही स्पर्धा आणखी महिनाभार चालण्याची शक्यता आहे. स्पर्धा झाल्यानंतर प्रथम पहिल्या 50 शहरांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर टॉप 20 व टॉप 10 अशी यादी तयार करण्यात येणार आहे. पहिल्या 20 शहरांना आकर्षक अशी बक्षिसे मिळणार आहे. सध्या राज्यातील चंद्रपूर, महाबळेश्‍वर व पाचगणी या शहरांमध्ये अधिक चुरस पहायला मिळत आहे. केंद्राच्या या स्पर्धेत ही तीन शहरे देशात पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत.   रोज या शहरांचे रेटींग बदलले तरी पहिले तीन क्रमांक सोडत नाही. 

जिल्ह्यातील तीन शहरे यात उत्तम कामगिरी करत असले तरी इतर शहरे मात्र साफ अपयशी ठरली आहेत. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष, लोकांनी न घेतलेला सहभाग व कमी झालेली जनजागृती, कडक अंमलबजावणीचा अभाव या कारणास्तव इतर पालिका या मागे पडल्या आहे. 

यापूर्वी वाई व कराड पालिकेने हागणदारी मुक्त, स्वच्छ भारत अभियानांमध्ये यश मिळवले आहे. मात्र, त्यानंतर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असतानाही म्हणावी तशी कृती या शहरांकडून होत नसल्याने पहिल्या 50 मध्ये तरी जिल्ह्यातील इतर शहरे येणार काय? अशी एक शंकाच आहे. 

याबाबत संबधित पालिकेच्या प्रशासनाने कात टाकून काम केले पाहिजे. स्पर्धा खूप पुढे गेली असली तरी स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास या शहरांना आगामी काळात फायदा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून घनकचरा प्रकल्पासाठी प्रत्येक शहराला कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात लोकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. हा सहभाग घ्यायचा असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधींना कार्यालयाबाहेर पडणे गरजेचे आहे.

सातारा, म’श्‍वर व पाचगणीत स्वच्छतेचा जागर

महाबळेश्‍वर व पाचगणी ही जगप्रसिध्द पर्यटनस्थळे आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या मोठी असते. या दोन्ही शहरांची लोकसंख्या मिळूनही 50 हजारांच्या पुढे नाही. मात्र, येणार्‍या पर्यटकांची संख्या लाखांहून अधिक असल्याने या पालिकांना स्वच्छता राखणे अपरिहार्य ठरते. पर्यटनस्थळाचा दर्जा टिकवणे व त्यातून आर्थिक प्राप्ती करण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. तर सातार्‍यातही गेल्या काही वर्षांपासून स्वच्छता मोहिम जोमाने राबवली आहे. त्यामुळे ही तीन शहरे फक्त स्पर्धा तोंडावर आली की स्वच्छता करतात असे नाही तर सातत्याने या ठिकाणी स्वच्छतेचा जागर सुरू असल्याने ही शहरे अव्वल ठरलेली आहेत. याचा इतर पालिकांनी आदर्श घेतला पाहिजे.