Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Satara › सातारा : दोन गटात राडा; चाकू हल्ल्यात युवक जखमी

सातारा : दोन गटात राडा; चाकू हल्ल्यात युवक जखमी

Published On: Aug 30 2018 4:01PM | Last Updated: Aug 30 2018 4:01PMसातारा : प्रतिनिधी   

सातारा येथील गजबजलेल्या विसावा नाका परिसरात युवकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. या हाणामारीत धारदार शस्त्राचा वापर होवून एकाला भोकसण्याचा प्रयत्न झाला. या हल्यात सुदैवाने जखमी युवकाने वार चुकवल्याने त्याच्या हाताला  गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज, गुरूवार (दि. ३० ऑगस्ट) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, विसावा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात युवकांचा एक गट जमला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर युवक जमत असतानाच युवकाच्या एका गटाने दुसर्‍या गटाला उद्देशून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तरूणांमध्ये तू तू.. मै मै सुरु झाल्यानंतर एका युवकाने धारदार शस्त्र काढून समोरच्या युवकावर हल्ला चढवला.

युवकाने चाकूचा हा वार चुकवला मात्र त्याच्या हातावर गंभीर दुखापत झाली. वर्दळीच्या ठिकाणी घटलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांची व बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सुमारे पाच मिनिटे हा थरार सुरु असतानाच ‘पोलिस आले.. पोलिस आले’ असा आरडाओरडा झाल्यानंतर हल्ला करणार्‍या युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या युवकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित युवक कॉलेजमधील असल्याची शक्यता असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून संशयितांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.