Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › साताऱ्यात सावकारी पाश; सिव्हिल इंजिनिअरची चौघांविरुद्ध तक्रार

साताऱ्यात सावकारी पाश; सिव्हिल इंजिनिअरची चौघांविरुद्ध तक्रार

Published On: Aug 22 2018 3:01PM | Last Updated: Aug 22 2018 3:01PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात सावकारीचा पाश अद्याप घट्ट असल्याचे आणखी समोर येत असून शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये नुकताच अटक झालेला अजमेर मुल्ला याचाही समावेश असून याप्रकरणातील तक्रारदार हे बी.ई. सिव्हील इंजिनिअर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अजमेर अकबर मुल्ला (रा.नागठाणे), लाला पंडित (रा.सातारा), सचिन नलवडे व अनोळखी एक या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संतोष कृष्णात घाडगे (वय 41, मूळ रा.कामेरी सध्या रा.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावकारी आणि जबरी चोरीची ही घटना डिसेंबर 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत बारावकरनगर, आशा कॉलनी, शिवराज पेट्रोलपंप परिसर व फिर्यादीच्या राहते घरी घडलेली आहे.

संशयितांनी आपआपसात संगनमत करुन तक्रारदार यांना व्याजाने पैसे दिल्यानंतर त्याची सक्तीने वसूली केली आहे. यावेळी तक्रारदार यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली असून घरातून जबरदस्तीने पाच लाख रुपये नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळ व व्याजाची रक्कम तीन लाख रुपये होत होती.

दरम्यान, सातार्‍यात खंड्या धाराशिवकर याच्या टोळीने धुडगूस घालत अनेक उच्च शिक्षितही सावकारी पाशात अडकविल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिव्हील इंजिनिअरही सावकारीने त्रस्त असल्याचे समोर आल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात सावकारीची पाळेमुळे घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.