Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Satara › तीन चोरट्यांना नागरिकांनी पकडले

तीन चोरट्यांना नागरिकांनी पकडले

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:25PMकराड : प्रतिनिधी

पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांसह पंपाच्या मालकीणीला दमदाटी करून लाथाबुक्क्या व विटेने मारहाण करत कर्मचार्‍याच्या बॅगमधील रक्‍कम हिसकावून घेत जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍यांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बुधवार पेठ, कराड येथील चौघांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. येथील कृष्णा नाक्यावरील मुळीक पेट्रोल पंपावर शुक्रवार, 18 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

अक्षय बाळासाहेब काटरे, गौरव बाबुराव लादे, सन्मेश रमेश वाघमारे (सर्व रा. बुधवार पेठ, कराड) व आणखी एक अनोळखी  अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर कुमार सुरेश घाणेकर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कुमार घाणेकर हा मुळीक पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो शुक्रवार दि. 18 रोजी कामावर गेला. त्यावेळी पंपाचे मालक विद्या संजय मुळीक याही केबिनमध्ये उपस्थित होत्या. रात्री साडेआठच्या सुमारास मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरत असताना कुमार घाणेकर यांच्याजवळ त्यांच्या ओळखीचे अक्षय काटरे, गौरव लादे, सन्मेश वाघमारे व आणखी एकजण आले. त्यांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करत घाणेकर याला मारहाण केली.

तसेच त्याच्या गळ्यात असलेली 2 हजार 760 रुपयांची बॅग हिसकावून घेत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पंपावरील इतर कर्मचारी व तेल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तिघांना पकडले. मात्र अनोळखी व्यक्‍ती तेथून पळून गेला. त्यानंतर घाणेकर यांनी अक्षय काटरे याच्याकडे असलेली पैशाची बॅग काढून घेतली. याचा राग येऊन संशयितांनी घाणेकरसह पंपावरील इतर कर्मचारी व विद्या मुळीक यांना शिवीगाळ, दमदाटी करून विटांनी मारहाण करत जखमी केले. याचवेळी पोलिस गाडी तेथे आल्याने नागरिकांनी संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिवराम खाडे करत आहेत.