Mon, May 20, 2019 07:59होमपेज › Satara › पालकांचा डोळा चुकवून मुले पोहायला

पालकांचा डोळा चुकवून मुले पोहायला

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 9:19PMसातारा : दीपक देशमुख

सध्या शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक मुले लगतच्या तलाव, विहिरींवर पोहण्यास जात आहेत. तथापि, अनेकजण आई-वडिलांचा डोळा चुकवून जात असल्याने मुलगा नक्की तलावात पोहायला गेला की मैदानात असतो, याची माहिती पालकांनाच नसते. रविवारच्या घटनेमुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. 

सध्या शाळांना सुट्टी लागली आहे. कडक उन्हाळा आणि मुलांपुढे मौजमजेसाठी अख्खा दिवस असल्याने अनेकजण नद्या, तलाव, विहिरींमध्ये पोहायला जाण्याचा पर्याय निवडतात. यामुळे सकाळपसून पोहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. परंतु, पोहताना दम लागल्यामुळे रविवारी सातार्‍यातील फुटका तलावात 13 वर्षाच्या सुमीत आगे या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी धोम धरणात युवकाचा बुडून झाल्यानंतर चारच दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे. सुमीत हा नियमीत पोहायला जात असल्याचे समजते. त्यामुळे घरच्यांना त्यांनी कल्पना दिली होती. तथापि, अनेक मुले मित्रांच्या संगतीने गावाबाहेरील विहिरी किंवा धरणांचा जलाशय याठिकाणी पोहोयला जात असतात. परंतु. मनसोक्त डुंबण्याची मौज जीवावरही बेतू शकते. धरणांच्या कालव्यातही परिसरातील मुले, युवक पोहण्यासाठी जात असतात. अनेकदा कालव्यात पाणी कमी असते. तथापि, धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पाण्याला ओढ लागून वाहून जाण्याचा धोका असतो. 

सातार्‍यात जिल्हा क्रीडा संकुलासह काही खासगी जलतरण तलाव आहेत. मात्र, सर्वसामान्यांना त्याचे शुल्क परवडणारे नाही. कमी शुल्कात असलेला सातारा नगरपालिकेचा जलतरण तलाव सुरू होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे काही मोजके जलतरणपटू वगळता बहुतेकजण विहीरी, तलाव, नद्यांचा पर्याय निवडतात. अशावेळी नवशिक्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे, तसेच दम लागल्यामुळे बुडण्याचा धोका असतो.

त्यामुळे मुले डोळा चुकूवन पोहायला जाणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे. शक्यतो चांगल्या जलतरण पटूच्या देखरेखीखाली तसेच कॅन, ट्यूब, फ्लोट असे सुरक्षिततेचे साहित्य मुलांनी घेतले आहे, हे कटाक्षाने पहाण्यााची गरज आहे. 

वाळू उपशामुळे नदीपात्रात महाकाय खड्डे

नदीपात्रात बेसुमार वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडलेले असतात.  हे खड्डे पाण्याखाली गेल्यामुळे पोहणार्‍यास त्याचा अंदाज येत नाही. कमी खोलीच्या पाण्यात अचानक एखाद्याचा पाय खड्ड्यात गेल्यास बुडण्याचा धोका संभवतो.