होमपेज › Satara › चैनीसाठी मुलांनी चोरल्या ६ दुचाकी

चैनीसाठी मुलांनी चोरल्या ६ दुचाकी

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 11 2018 11:37PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरातून तब्बल 6 दुचाकी व 1 सायकल चोरी केल्याप्रकरणी तीन युवकांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिघेही अल्पवयीन असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. केवळ चैनीसाठी दुचाकी चोरून ते वापरत होते. दरम्यान, संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. याप्रकरणी पोनि नारायण सारंगकर यांनी डीबी विभागाला दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. डीबी पथक गस्त घालत असताना एक मुलगा दुचाकीवरून येत असताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला बाजूला घेऊन चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना तो मुलगा सज्ञान नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुचाकीची कागदपत्रे व लायसेन्स मागितले. त्यामुळे तो मुलगा गडबडला. पोलिसांनी त्याला विश्‍वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर संशयित अल्पवयीन मुलाने त्याच्या आणखी दोन साथीदारांची नावे सांगून त्यांनी एकूण सहा गाड्या चोरल्या असल्याची कबुली दिली. संशयितांकडून पोलिसांनी 3 स्प्लेंडर, 1 प्लॅटिना, 2 एमएटी व 1 साधी सायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. दरम्यान, अल्पवयीन मुलांनी सात दुचाकी चोरी केल्याने खळबळ उडाली असून ज्यांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण पोलिस, पोलिस हवालदार मुनीर मुल्‍ला, अविनाश चव्हाण, अनिल स्वामी, पंकज ढाणे, सुनील भोसले, अमोल साळुंखे, धिरज कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.