Wed, Sep 19, 2018 12:31



होमपेज › Satara › सातारा : काळोशीतील चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

सातारा : काळोशीतील चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 06 2018 9:12PM | Last Updated: Feb 06 2018 9:12PM



सातारा : प्रतिनिधी

काळोशी, (ता. सातारा) येथील आरोही उर्फ गौरी महेश अवघडे या अवघ्या सहा महिन्यांच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीला सहा महिन्यानंतर दिला जाणारा डोस दिल्यामुळेच बालिकेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांना केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरु होती. व्हिसेरा पुण्याला पाठवला जाणार असून त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोहीचे वडील चालक असून आई गृहिणी आहे. आरोही सहा महिन्यांची झाल्याने सोमवारी तिला तिच्या आई व आजीने सहा महिन्यानंतर लहान मुलांना दिला जाणारा डोस देण्यासाठी आरोहीला चिंचणेर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कोडोली येथे घेऊन गेल्या होत्या. डोस दिल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. मंगळवारी सकाळपासून तिला त्रास होवू लागला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ती निपचीत पडल्याने अखेर तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

आरोहीच्या मृत्‍यूमुळे कुटुंबियांनी रुग्णालयातच टाहो फोडला. डोस दिल्यानेच बालिकेचा मृत्यू झाल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात सुरक्षा वाढविण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदनt करुन त्याचा व्हिसेरा पुण्याला पाठवला जाणार आहे. यानंतर मृत्यूचे कारण समजेल असे वैद्यकीय अधिकर्‍यांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु होती.