Mon, Aug 26, 2019 01:31होमपेज › Satara › बाल वारकर्‍यांनी दिंडीतून केले समाजप्रबोधनाचे कार्य

बाल वारकर्‍यांनी दिंडीतून केले समाजप्रबोधनाचे कार्य

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:28PMपुसेसावळी/औंध : वार्ताहर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात झालेल्या आगमनाचे औचित्य साधून जि.प.केंद्रशाळा कळंबी (ता.खटाव)येथील विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक दिंडी काढून गावात भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. वारीत परब्रम्ह पांडुरंग, रुक्मिणी, संत तुकाराम, मुक्ताई, जनाईसह भालदार, चोपदार यांची वेशभूषा करुन बाल वारकरी ज्ञानोबा -माऊली -तुकाराम असा अखंड जयघोष करीत होते.

या दिंडी सोहळ्यात शालेय वारकर्‍यांनी वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण, बालहत्या, जलसाक्षरता, प्लॅस्टिकबंदी यावर घोषवाक्ये व घोषणा देवून समाजप्रबोधनाच्या केलेल्या प्रयत्नाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. दिंडी सोहळ्यात ग्रामपंचायत चौकात मुलामुलींच्या फुगड्या पाहून ग्रामस्थांनाही मोह आवरता आला नाही.त्यांनीही फुगड्यासह गोल रिंगण करून अभंग म्हटले.

गावात ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे स्त्रीया व पुरूषांनी दर्शन घेवून औक्षण केले. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होताना दत्तचौकात गोल उभे रिंगण करुन अभंग, ओव्या, हरिपाठ करुन आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक धनाजी थोरवे, योजना घार्गे, स्वाती थोरवे, मिरा शिरसाठ, उपसरपंच अधिक घाडगे, समितीचे अध्यक्ष भगवान पवार, ग्रामपंचायत सदस्य,भजनी मंडळ व वारकर्‍यांचे सहकार्य लाभले.