Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Satara › रहिमतपूरचे मुख्याधिकारी  प्रमोद सवाखंडे निलंबित

रहिमतपूरचे मुख्याधिकारी  प्रमोद सवाखंडे निलंबित

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:37PMसातारा : प्रतिनिधी

रहिमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांच्या निलंबनाचे आदेश नगर विकास खात्याने दिले आहेत. मलकापूर (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीमध्ये कामात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय, रहिमतपूर नगरपालिकेतही सवाखंडेंचे  कामकाज वादग्रस्त राहिले.  

रहिमतपूरमध्ये रिटर्निंग वॉल बांधल्यानंतर कामाचे रिटेंडर तीन वर्षांनी बेकायदेशीरपणे काढल्याची तक्रार विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली होती.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

रहिमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांना निलंबित करण्यात आल्याने जिल्ह्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या कार्यालयांत चर्चा सुरू झाली आहे. सवाखंडे हे रहिमतपूर नगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी मलकापूर (जि. कोल्हापूर) येथे केलेल्या कामांचे कारनामे समोर आले. त्यांनी कामात अनियमितता केल्याचे निष्पन्‍न झाले. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सवाखंडे यांनी मलकापूर नगरपंचायतीत ज्या पद्धतीने कारभार केला, तोच कित्ता त्यांनी रहिमतपूर पालिकेतही गिरवण्याचा प्रयत्न केला. सभागृहात विषयपत्रिकेवर आलेल्या विषयांची कायदेशीर बाजू पडताळून पाहिली गेली नाही. तीन वर्षांपूर्वी कुंभारवाडा परिसरातील रिटर्निंग वॉलच्या झालेल्या सुमारे 28 लाखांच्या कामाची बिले काढण्यासाठी त्यांनी त्या कामाची बेकायदेशीरपणे टेंडर प्रक्रिया राबवली. त्याला विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्यासह इतर विरोधी नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, त्यांची दखल न घेता विषय मंजूर करुन टेंडर काढण्याचा प्रयत्न केला.

त्याची तक्रार संचालक, नगरपालिका प्रशासन  कार्यालय पुणे यांच्याकडे झाली. त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. डीएमए ऑफिसच्या अधिकार्‍यांनी रहिमतपूर येथे येवून कामाची चौकशी केली व पाहणीनंतर वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला. दरम्यानच्या काळात सवाखंडे यांची नांदेडला बदली झाली. मात्र, कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने त्यांनी शासनावर नाराज होवून ‘मॅट’मध्ये गेले. त्यांच्या बाजूने निकाल लागल्यावर ते पुन्हा रहिमतपूर नगरपालिकेत रुजू झाले. मात्र, त्यांनी मलकापूर तसेच रहिमतपूर येथे केलेल्या कारभाराची चौकशी केल्यानंतर नगर विकास खात्याच्या सहसचिवांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.