Wed, Jul 24, 2019 06:11होमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांना कराडात बंदी

मुख्यमंत्र्यांना कराडात बंदी

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:00AMकराड : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कराडमध्ये ‘ठोक मोर्चा’ काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज बांधवांबाबत केलेल्या वक्‍तव्याचा आंदोलनकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय न दिल्यास 25 नोव्हेंबर रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यासाठी त्यांना कराडमध्ये येऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा क्रांती ‘ठोक मोर्चा’स प्रारंभ झाला. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले. तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मराठा समाज बांधवांनी ठिय्या मांडला होता. यादरम्यान, अनेक मराठा समाज बांधवांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्‍त करत आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी विविध संघटनांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामध्ये वकील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे सर्व खटले मोफत लढणार आहे. त्यानंतर बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी ठिय्या आंदोलन स्थळी आले. त्यांनी मराठा आरक्षणांच्या मागणीस पाठिंबा देत असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. आंदोलनावेळी नांदलापूर येथील मुलींनी दांडपट्याचे खेळ सादर केले.   

दरम्यान, मराठा समाजाचा अवमान करणारी वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी भावना व्यक्त करत मराठा समाज बांधवांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली. तसेच देशाचे माजी उपपंतप्रधान तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची कराड ही कर्मभूमी आहे. 25 नोव्हेंबरला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, विविध पक्षांचे नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे 25 नोव्हेंबरपर्यंत शासनाने मराठा समाजाला न्याय न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कराडमध्ये येऊ देणार नाही, असा सज्जड इशाराही मराठा समाज बांधवांनी दिला आहे.