Thu, Jul 18, 2019 02:41होमपेज › Satara › यशवंतरावांची स्वप्नं आजही अधुरी   

यशवंतरावांची स्वप्नं आजही अधुरी   

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला. पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. मात्र, समृद्ध आणि विकसनशील महाराष्ट्रासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्नं आजही सत्यात उतरली नाहीत, अशी खंत व्यक्‍त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकाळ सत्ता भोगणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. 

भाजपच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, ना. शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले,   भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्याचा कसा विकास झाला पाहिजे, या संदर्भातली स्व. यशवंतराव चव्हाण यांची काही स्वप्नं होती. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी पाहिलेली स्वप्नं, समतोल विकास, वंचितांचा विकास, शेतकर्‍यांचा विकास या सर्व बाबींवर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला. आज राज्य सरकारमध्ये काम करत असताना चव्हाण साहेबांनी पाहिलेली स्वप्न अद्यापही पूर्ण होवू शकलेली नाहीत हेच दिसून येते.  राज्यकर्त्यांनी वेळोवेळी यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगितला मात्र प्रत्यक्ष कृतीमध्ये तो उतरला नाही, अशी टीका काँग्रेस- राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळत केली. 

शेतकरी, सामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला आकार दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. त्यांचे विचार आणि स्मृती जपण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कालच 15 लाख 42  हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर साडे सहाशे कोटी रुपये कर्जमाफीचे जमा झाले आहेत. ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्ज भरले आहे त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देत आहोत. ऊसाचा प्रश्‍न असेल, एफआरपी असेल, या सगळ्या प्रश्‍नावर सरकारने सकारात्मक तोडगा काढला आहे. देशात सकारात्मक विचाराने काम करणारे भाजपचे सरकार आहे. सामान्य शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, वंचित या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येथून  पे्रेरणा घेण्यासाठी मी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.