Wed, Jul 17, 2019 18:54होमपेज › Satara › प्रतिनियुक्‍तीवरील कर्मचार्‍यांचे वर्षानुवर्षे ठाण

प्रतिनियुक्‍तीवरील कर्मचार्‍यांचे वर्षानुवर्षे ठाण

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विविध विभागात काम करण्यासाठी सर्वच कर्मचारी उत्सुक असतात. कधी अधिकार्‍यांशी तर कधी राजकीय सेटिंग करून आपली खुर्ची टिकवण्यात अनेकजण माहीर झाले आहेत. कामाला दांड्या मारणार्‍या तसेच बदल्यांचे नियम धाब्यावर बसवून वर्षानुवर्षे एकाच टेबलाला अधिकारी कर्मचारी चिकटले असल्याचे चित्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये पहावयास मिळत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रतिनियुक्ती रद्दचा आदेश काढला होता तोही बासनात गुंडाळला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रतिनियुक्तीवर 5 वर्षाहून अधिक काळ कर्मचारी काम करत असल्यामुळे  या कर्मचार्‍यांची चांगलीच मक्तेदारी वाढली आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेत कामानिमित्त होणार्‍या नागरिकांची कामे होताना दिसत नाहीत. प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेत चांंगलेच बस्तान बांधले आहे.  कोणीही नव्याने अधिकारी  जिल्हा परिषदेत आला तरी प्रतिनियुक्तीवर असलेला कर्मचारी  संबंधित विभागातून हलत नाही हा नित्य नियम झाला आहे. प्रत्यक्षात ज्या विभागासाठी  संबंधित कर्मचार्‍यांची गरज आहे. गरज लक्षात घेवून संबंधित कर्मचार्‍यांची बदली केली असतानाही ते आपला तळ काही सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाचे संपूर्ण कामकाजच कोलमडून गेले आहे. 

प्रत्येक विभागातील  संबंधित कर्मचार्‍याची बदली झालेली असतानाही पुन्हा त्याच पदावर , त्याच ठिकाणी त्याच खुर्चीवर आणण्याचा प्रयत्न  वरिष्ठ अधिकारीच करत आहे. त्यामुळे  बदली झालेल्या कर्मचार्‍यांना बदलीच्या ठिकाणी सोडावयाचे नसेल तर कागदोपत्री कर्मचार्‍यांच्या बदल्या रंगविण्याचे कारणच काय असा सवाल अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांकडून  होत आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या  कर्मचार्‍यांची चांगलीच मक्तेदारी वाढली आहे.  एकाच ठिकाणी  काम करत असणारे कर्मचारी हम करे सो कायदा या प्रमाणे वागत आहेत.  हे कर्मचारी अधिकार्‍यांपुढेही स्वत:चा रूबाब मिरवत  आहेत.  

एकाच टेबलवर अनेक वर्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून नागरिकांच्या कामांना विलंब लागत आहे त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  याबाबत अनेक नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या असल्या तरीही वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर  काहीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रकार झेडपी व पंचायत समित्यांमध्ये पहावयास मिळत असल्याने या  कर्मचार्‍यांचे चांगलेच फावले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी लक्ष घालून  एका विभागात अनेक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.