Wed, Jun 26, 2019 17:59होमपेज › Satara › सातार्‍यात छत्रपती शिवरायांच्या हाताचा ठसा

सातार्‍यात छत्रपती शिवरायांच्या हाताचा ठसा

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:14PMसातारा : प्रविण शिंगटे

छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारच्या भूमीत त्यांच्या शौर्याच्या पाऊलखुणा आजही उमटलेल्या दिसतात. शिवकालीन समाजजीवन आणि युध्दनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या विविध वस्तु सातारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पहावयास मिळत आहेत. छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा ठसा पाहिला की बघणार्‍याला जणू काही सोळा हत्तीचं बळ येत आहे. 

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणजे आम जनतेसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे होनही या संग्रहालयामध्ये प्रतिकृतीच्या रूपामध्ये पहावयास मिळतात. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा ठसा एका कागदावर पहावयास मिळतो. चंदनाच्या लेपात बुडवून उमटवलेला हा ठसा शिवप्रेमींच्या भावनांचे केंद्र बनले आहे. म्हसवडच्या राजेमाने यांनी हा ठसा या संग्रहालयाला भेट दिल्याचे संग्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

शिवभारत ग्रंथातील शिवाजी महाराज यांची जन्मकुंडली, शिवराई नाणी, राजमुद्रा, लेखनसीमा, जिरे टोप, मराठेशाहीतील पगडी, अंगरखे, शेला, 16 व्या व 18 व्या शतकातील  अडकित्ते, तलवारी, दाणपट्टे, भाले, कुर्‍हाडी, बंदुका, कट्यारी, खंजीरे, धनुष्यबाण, चिलखत, शिरस्त्राणे, ढाली, तोफेचे गोळे, हस्तीदंत मुठीच्या तलवारी, चांदीचे नक्षीकाम असलेल्या तलवारी आदी विविध शस्त्रे पाहताना त्याकाळचा इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळतो. अत्तरदाणी, गुलाबदानी, जेडधातुचे पदक, लाकडी टाक, पितळी आरसा, किल्ल्याच्या दरवाजांचे लोखंडी कुलूप, हस्तीदंती चौरंग, तांब्यांचे हंडे, चामड्याचे तेलाचे बुधले यासह विविध जुन्या पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

संग्रहालयातील विविध प्रकारच्या ऐतिहासिक वस्तु शिवकालीन जनजीवनच रेखाटून जात आहेत. त्यामुळे या संग्रहालयातील इतिहासकालीन विविध वस्तु शिवप्रेमींसाठी दुर्मिळ ठेवा बनल्या आहेत.