Thu, Jan 24, 2019 13:59होमपेज › Satara › नेमणुकीच्या बोगस ऑर्डर देऊन फसवणूक 

नेमणुकीच्या बोगस ऑर्डर देऊन फसवणूक 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMभुईंज : वार्ताहर

आरोग्य विभागात शिपाई़, क्लार्क सुपरवायझर यांच्या नेमणुकीच्या बोगस ऑर्डर देऊन लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या भामट्याने अनेकांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, व्याहळी, ता. वाई येथील मीरा जयंत जगताप व तेजस जयंत जगताप या कुटुंबाची पुणे ते सातारा प्रवास करत असताना बसमध्ये त्यांची ओळख डॉ. रवींद्र ऊर्फ राजेंद्र श्रीराम पाटील, सेंट्रल विभाग, पुणे असे नाव असणार्‍या इसमाशी झाली. यामध्ये त्याने आरोग्य विभागात आपण शिपाई, क्लार्क, सुपरवायझर या पदांच्या डायरेक्ट ऑर्डर काढतो, असे सांगून त्यांच्याकडून 1200, 3000 असे टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरूवात केली.  

तुमच्या ओळखीने आणखी कोण गरजू उमेदवार असेल तर त्यांची ओळख करून द्या, असे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केली, असल्याची माहिती व्याहळी येथील  फसवणुक झालेल्या जगताप कुटुंबाने भुईंज प्रेस क्‍लबला सांगितली. ऑर्डर लेखी मिळेपर्यंत कोठेही याची वाच्यता करू नका, असे सांगत हा इसम अनेकांना लुबाडत राहिला. त्यांच्याकडून त्याने लाखो रूपये उकळले, असेही त्यांनी सांगितले. 
यादरम्यान या इसमाने आणखी लाभार्थी मिळतील म्हणून व्याहळी येथील एका महिलेस व तिच्या मुलास ग्रामीण रूग्णालय वाई येथे सुपरवायझर व शिपाई अशी ऑर्डर आरोग्य सहसंचालक सेवा, पुणे यांच्या सही व शिक्क्याने इंटरनेटद्वारे इमेल केली.

यापैकी भुईंजमधील एका बारावी परीक्षा दिलेल्या तरूणाची शिपाई म्हणून ग्रामीण रूग्णालय भुईंज येथे इमेलद्वारे ऑर्डर पाठविली. ती ऑर्डर घेवून भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात हा तरूण पोहोचला असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश बिरारी यांनी ही ऑर्डर बोगस असल्याचे निदर्शनास आणून दिले. आमच्या आरोग्य केंद्रात चारही शिपाई आहेत व आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडून  आदेश प्राप्त होतात.  त्यामुळे ही ऑर्डर बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर जगताप कुटुंबाने अन्य कोणाची आणखी फसवणूक होवू नये म्हणून भुईंज प्रेस क्लबच्या पत्रकारांशी संवाद साधला.