Sun, Jul 21, 2019 01:54होमपेज › Satara › छत्रपती शिवाजी संग्रहालय युद्धनीतीचे साक्षीदार

छत्रपती शिवाजी संग्रहालय युद्धनीतीचे साक्षीदार

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 18 2018 12:00AMसातारा : प्रवीण शिंगटे

रयतेचे राज्य स्थापन करून मराठ्यांचा पराक्रम, शौर्याची गाथा सर्वदूर पसरविणार्‍या छत्रपती शिवाजी  महाराजांच्या शिवकालीन समाजजीवन आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या विविध वस्तू सातारच्या श्री  छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पहावयास मिळत आहेत. या संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाची साक्ष दिली जात असून हा दुर्मीळ ऐवज म्हणजे सातार्‍याचा ऐतिहासिक ठेवा बनून राहिला आहे. 

सातारा नगरी ही ऐतिहासिक  वारसा असलेली नगरी. सह्याद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याचे लेणे घेऊन वसलेली नगरी आहे. सातार्‍यात  छत्रपती  शिवाजी महाराज संग्रहालयाची स्थापना 1970 साली झाली.संग्रहालयात मराठाकालीन शस्त्रास्त्रे, हत्यारे, चिलखते, त्या काळातील नाणी,  शिवाजी महाराजांचा हाताचा ठसा, शिवछत्रपती कालीन वस्त्रे, प्रावरणे, पगडी, शेला, शिवकालीन वस्तूंचा दुर्मीळ ठेवा शिवाजी वस्तू संग्रहालयामध्ये पहावयास मिळत आहे. थोरल्या महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली ही प्राचीन गादी या विभागात जतन केली आहे. 

शुक्रवार दि. 18 मे जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जात आहे. शिवाजी वस्तू संग्रहालयातून इतिहासकालीन ठेवा जतन केला जात आहे. शिवाजी महाराजांचे ‘होन’ ही या संग्रहालयामध्ये प्रतिकृतीच्या रूपामध्ये पहावयास मिळतात. संग्रहालयामध्ये प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी असलेले 4 विभाग आहेत तसेच मराठा आर्ट गॅलरीचीही उभारणी करण्यात आली आहे.  शस्त्र विभाग, अभिलेख विभाग, चित्र विभाग व वस्त्र विभाग अशी दालने तयार करण्यात आली आहेत. संग्रहालयातील शस्त्र दालन परिपूर्ण असून प्रामुख्याने मराठाकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पहावयास मिळत आहेत. तलवारी, दांडपट्टे, भाले, कुर्‍हाडी, बंदुका, कट्यारी, खंजीरे, धनुष्यबाण, पिस्तुले, चिलखत, शिरस्त्राणे, ढाली, तोफेचे गोळे ही शस्त्रे आहेत. एकेरी वाघनख आणि पाच नखे असलेले वाघनख प्रदर्शनीय आहेत. जेडच्या मुठी व छोटा बिचवा विशेष उल्लेखनीय आहे. अटकेपार झेंडा लावणार्‍या  हत्तीच्या गंडस्थळावर बांधण्याचे शस्त्र उल्लेखनीय आहे. तीन पाती असलेली कट्यार, हस्तीदंत मुठीच्या तलवारी, खंजीरे, चांदीचे नक्षीकाम असलेल्या तलवारी, पात्यावरती नक्षीकाम कोरलेली पार्शी मजकूर कोरलेली तलवार लक्ष वेधून घेत आहे. 

संग्रहालयातील विविध प्रकारच्या  ऐतिहासिक वस्तू त्या काळातील इतिहासाबाबत बरेच काही सांगून जात आहेत. त्यामुळे या संग्रहालयातील इतिहासकालीन विविध वस्तू सातारकरांसाठी दुर्मीळ ठेवा असल्याचे दिसून येते.