Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Satara › सार्वजनिक स्वच्छतागृहांची पडझड

सार्वजनिक स्वच्छतागृहांची पडझड

Published On: Feb 12 2018 2:08AM | Last Updated: Feb 11 2018 7:41PMचाफळ : राजकुमार साळुंखे

एकीकडे संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवत शहरेच्या शहरे नव्या जोमाने कामाला लागली आहेत. त्याचबरोबर राज्य शासन, केंद्र सरकारही यासाठी करोडो रूपये खर्च करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. मात्र चाफळ विभागातील पाडळोशीत मात्र याउलट चित्र पहावयास मिळत असून स्वच्छतागृहांची बिकट अवस्था झाली आहे. पाडळोशी गाव हे सुमारे 600 ते 700 लोकवस्ती आहे. या गावातील वाघनाथाचे मंदिर संपूर्ण विभागात प्रसिद्ध आहे. दररोज या मंदिरात बाहेरगावाहून अनेक भक्त मुक्कामास येत असतात. त्यामुळे या भक्तांना चांगल्या सोयी - सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यटनातून ग्रामपंचायतीला चांगला महसूल मिळून त्याचा गावच्या विकासासाठी वापर करणेही सहजशक्य आहे. मात्र पर्यटकांच्या गैरसोयीकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाल्याने गावातील ग्रामस्थांबरोबरच पर्यटकांना उघड्यावर शौचालयास बसावे लागत आहे. त्यामुळे गावाच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यावरही होत आहे. सध्यस्थिती काही  ग्रामस्थांच्या घरी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागत असून याच गावच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहांची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.