Sat, Nov 17, 2018 01:44होमपेज › Satara › सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वरमधील वाहतुकीत बदल

सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वरमधील वाहतुकीत बदल

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:06PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

नाताळ सणामुळे सलग सुट्ट्या लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाबळेश्‍वर येथे गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन दि. 20 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत तेथील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. बदलामध्ये एकेरी वाहतूक, मोठ्या वाहनांना ठराविक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. दरम्यान, पर्यटकांनी महाबळेश्‍वर पर्यटनाचा आनंद लुटताना वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

पुढील आठवड्यात नाताळ सणानिमित्त सलग सुट्ट्या आहेत. या कालावधीत महत्वाच्या व्यक्‍ती, देश-परदेशातील पर्यटक महाबळेश्‍वरमध्ये येतात. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्यांतर वाहतूक कोंडी होवून गोंधळ होवू नये, यासाठी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याचे पोनि दत्तात्रय नाळे यांनी प्रभावी आराखडा तयार केला आहे. लिंगमळा फाटा-लिंगमळा धबधबा-भेकवली फाटा यावरुन एकेरी वाहतूक होणार आहे. तसेच भेकवली फाटा ते खालचा लिंगमळा धबधबापर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.

विमल गार्डन दि महाबळेश्‍वर क्‍लब रस्त्यावर एकेरी वाहतूक राहणार असून महाबळेश्‍वर क्‍लब ते विमल गार्डन सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी राहणार आहे. क्षेत्रमहाबळेश्‍वर नाका ते नाकिंदा बसस्टॉप एकेरी वाहतूक राहणार असून नाकिंदा बसस्टॉप ते क्षेत्र महाबळेश्‍वर नाका सर्व वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. महाबळेश्‍वर ते क्षेत्र महाबळेश्‍वर व आर्थर सीट पाँईट या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.

महाबळेश्‍वरमधील 15 दिवसांच्या कालावधीत अशा पध्दतीने वाहतूक होणार असल्याने उल्‍लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.