Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Satara › सातारा जिल्हाधिकारी निवासस्थानात चंदनचोरी

सातारा जिल्हाधिकारी निवासस्थानात चंदनचोरी

Published On: Sep 06 2018 1:57AM | Last Updated: Sep 05 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात चोरट्यांनी खैंदुळ घातले असून थेट सातारा जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरात तब्बल 10 ते 12 चंदनाची झाडेच तोडून चोरून नेली असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, सैनिक स्कूल परिसरातही गेल्या काही दिवसांपूर्वी चंदनाची झाडे चोरीला गेली असून वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे हे दोन्ही परिसर कितपत सुरक्षित आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.

सर्कल अधिकारी शिवाजी पिसाळ यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयाच्या समोरच जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे. या परिसरात दि. 3 सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीची 10 ते 12 चंदनाची झाडे कापून नेली.

हा सर्व प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत महसूल विभागाला सांगितल्यानंतर सर्कल अधिकार्‍यांनी पाहणी करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला. चंदनाची चोरीला गेलेली झाडे 3 फूट उंचीचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी निवासस्थान व सैनिक स्कूल परिसरात चोरटे बिनधोकपणे चंदनाची झाडे कापून नेत असल्याने सुरक्षितेबाबत चिंता व्यक्‍त केली जात आहे.