होमपेज › Satara › कोरेगावजवळ रेल्वेच्या धडकेत ट्रॅक्टरचे तुकडे

कोरेगावजवळ रेल्वेच्या धडकेत ट्रॅक्टरचे तुकडे

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

चालुक्य एक्स्प्रेसने कोरेगाव येथे  रेल्वे रुळावर एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामध्ये ट्रॅक्टरचे अनेक तुकडे झाले असून रेल्वे इंजिनचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रेल्वे रुळावरून घसरली नसल्याने मोठा  अनर्थ टळला. दरम्यान, अपघातामुळे तीन तास रेल्वे उशिरा सोडण्यात आली. 

यशवंतपूर-दादर ही चालुक्य एक्स्प्रेस  यशवंतपूर, हरिहर, हुबळी, बेळगाव, सांगलीहून  सातारकडे येत होती. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे कोरेगाव येथे आल्यानंतर अपघात झाला. अपघातामध्ये जोराचा आवाज झाल्याने रेल्वे चालकासह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. इंजिन चालकाने तत्काळ रेल्वेवर ताबा मिळवत ती थांबवली. या घटनेची तत्काळ सातारासह रेल्वे प्रशासनााला माहिती दिली.

इंजिन चालकाने पाहिले असता आजूबाजूला ट्रॅक्टरचे तुकडे पडलेले दिसले. अपघातावेळी ट्रॅक्टरच रुळावर असल्याने त्याचे तुकडे होवून आजूबाजूच्या परिसरात विखुरले गेले. रेल्वेची धडक बसल्याने ट्रॅक्टरचा अक्षरश: चक्‍काचूर झाला. हा ट्रॅक्टर नवीन होता. त्यामुळे त्याला क्रमांकही नव्हता. अपघातानंतर रेल्वे चालकाने सातारापर्यंत रेल्वे आणल्यानंतर पुन्हा इंजिनची पाहणी केली असता इंजिनचे मोठे नुकसान झालेले होते. यामुळे दुसरे इंजिन येईपर्यंत चालुक्य एक्सप्रेस सातारा रेल्वे स्थानकावरच तीन तास थांबवण्यात आली. इंजिन आल्यानंतर पहाटे उशीरा चालुक्य एक्सप्रेसने पुण्याकडे प्रयाण केले. या सर्व प्रकारामुळे रेल्वेतील प्रवाशांना  त्रासाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, सातारा रेल्वे पोलिसांनी तत्काळ खबरदारीचे पाऊले उचलत कोरेगावजवळ झालेल्या अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी ट्रॅक्टरचा अक्षरश: सांगाडा राहिला होता. रेल्वेच्या धडकेने ट्रॅक्टरचे इंजिन, टप, ट्रॉली याचे तुकडे झाले होते. ट्रक्टरची ट्रॉली मोकळी असल्याने रेल्वे रुळावरुन घसरली नाही. ट्रॉलीमध्ये अवजड साहित्य असते तर रेल्वेचा भीषण अपघात होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली. यामुळे चालुक्य एक्सप्रेसमधील प्रवाशांचे नशीब बलवत्तर मानले जात आहेे.

रुळावर ट्रॅक्टर आलाच कसा?

अपघाताबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. ट्रॅक्टर रेल्वे रुळावर उभा केलाच कसा? यावेळी संबंधित मालक - चालक होते तरी कुठे? असे प्रश्‍न यानिमित्ताने उभे रहात आहेत. ट्रॅक्टरवर क्रमांक नसल्याने व तो नवीन असल्याने पोलिस मालक व चालकाबाबत माहिती घेत होते. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात रेल्वे कायदा कलमाद्वारे गंभीर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

सातारा रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्‍त डी.विकास यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिस निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एच.वाय. पवार, ए.आय. बागवान, पोलिस हवालदार विजय पाटील हे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी चालुक्य रेल्वे चालक मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे.