Thu, Apr 18, 2019 16:13होमपेज › Satara › कराड उत्तरेत राष्ट्रवादीपुढे आव्हान

कराड उत्तरेत राष्ट्रवादीपुढे आव्हान

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:12PMकराड : प्रतिनिधी 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी दोन दिवसांपूर्वी धैर्यशिल कदम यांनी शड्डू ठोकला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने मारलेली बाजी, कोपर्डे हवेलीसारख्या ठिकाणी काँग्रेसने दिलेला झटका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसपुढे कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. मात्र असे असले तरी तिरंगी लढतीचा फायदा आजवर राष्ट्रवादीलाच झाल्याचा इतिहास असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार की दुरंगी? यावरच निवडणूक निकाल अवलंबून राहणार आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितांवर कराड उत्तरचे विशेषत: काँग्रेसचे भवितव्य टिकून असते. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि आ. बाळासाहेब पाटील गटातील 2014 च्या ऐन निवडणुकीत झालेली अलिखित युती कराड उत्तरच्या निकालावर परिणाम करणारी ठरली होती, असे आजही बोलले जाते. मागील विधानसभेवेळी अनपेक्षित घटना घडल्या होत्या. मात्र आता धैर्यशिल कदम यांच्यासह उत्तरमधील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आत्तापासूनच सावध पवित्र्यात आहेत.

पाच जिल्हा परिषद सदस्य आणि गावागावात आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधी गटाची ताकद आपल्याच पाठिशी असल्याचे दाखवण्यासाठी हिंदुराव पाटील, भीमराव पाटील, निवासराव थोरात, सुदाम दिक्षीत यांच्यासह आजी - माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी विशेषत: आ. बाळासाहेब पाटील गटाला आत्तापासून विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळेच कराड उत्तरमध्ये दुरंगी लढत झाल्यास आ. बाळासाहेब पाटील गटाला विधानसभेतील विजयासाठी घाम गाळावा लागणार असून तिरंगी लढत झाल्यास मात्र मतविभाजनाचा फटका मागील निवडणुकीप्रमाणे विरोधकांना बसणार का? याचे उत्तर मात्र निवडणूक निकालानंतरच मिळणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह सात उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या मनोज घोरपडे यांना 43 हजार 903 तर कदम यांना 57 हजार 817 मते मिळाली होती. त्याचवेळी आ. पाटील यांना मात्र 78 हजार 324 मते मिळाली होती. त्यामुळेच कदम व घोरपडे यांना मिळालेल्या मतांच्या बेरजेवरही भाजपासह विरोधी पक्षाचे लक्ष असणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी भाजपासह काँगे्रसने दिलेला धक्का पाहता राष्ट्रवादीकडून निश्‍चिपणे ‘पॅचवर्क’ केले जात आहे. त्यामुळेच कराड उत्तरेत दुरंगी लढत होणार की तिरंगी? याबाबत आत्तापासून तर्कविर्तकांना उधाण आले असून दुरंगी लढत झाल्यास राष्ट्रवादीपुढील अडचणीत भर पडण्याची शक्यताच अधिक असल्याची सध्यस्थिती आहे. तसेच काँग्रेसतंर्गत मतभेद कोणत्या वळणावर पोहचणार ? हेही आगामी काळात स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.