Tue, Feb 18, 2020 01:29होमपेज › Satara › भोंदूगिरीचे  पोलिसांसमोर आव्हान 

भोंदूगिरीचे  पोलिसांसमोर आव्हान 

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 11:01PM
तळमावले : नितीन कचरे 

करपेवाडी ता.पाटण येथील भाग्यश्री संतोष माने (वय 17) या महाविद्यालयीन युवतीची मंगळवार दि. 22 जानेवारी रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अखेर भाग्यश्रीचे वडील संतोष वसंत माने (वय 37) यास घटना घडल्यापासून 18 व्या दिवशी संशयित म्हणून  अटक केले. 

संतोष माने याने घडलेल्या घटनेची फिर्याद दिली होत. फिर्यादीसच पोलिसांनीअटक केल्यामुळे तळमावले, ढेबेवाडी विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अतिशय क्रुरपणे गळा चिरून भाग्यश्रीची हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासावरुन भाग्यश्रीचा खून अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जर खरच भाग्यश्रीचा खून नरबळीचा प्रकार असेल तर संपूर्ण पाटण तालुक्याला काळींबा फासणारी घटना म्हणून ही घटना नमूद होईल. पोलिसांनी तळमावले, ढेबेवाडी,  विभागातील तसेच परराज्यातील मांत्रिकांची कसून चौकशी केली आहे. पुढे जाऊन सत्य बाहेर येईलच. मात्र अजूनही तळमावले, ढेबेवाडी विभाग अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला असल्याचे समोर येते आहे.

खासकरून तळमावले विभागातील काही भोंदू बाबा, त्यांचे चेले भोळ्या भाबड्या जनतेच्या भावनेशी खेळून आपली अंधश्रद्धेची दुकानदरी चालवत आहेत. ही दुकानदरी बंद होणे गरजेचे आहे. पुढेे जाऊन ही अंधश्रद्धा कोणत्याही थराला जाऊ शकते. पाटण तालुक्यातील बहुतांश लोक दुर्गम भागात रहात आहेत. काही देवऋशी त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत. तळमावले, ढेबेवाडी विभागामध्ये असे काही लोक आहेत का, जे बाहेरील भोंदूबाबांचे एजंट म्हणून काम करत आहेत. त्यांचा देखील पोलिसांनी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.