Fri, Jun 05, 2020 10:57होमपेज › Satara › चाफळ पर्यटनस्थळ निधीपासून वंचित

चाफळ पर्यटनस्थळ निधीपासून वंचित

Published On: Apr 25 2019 1:46AM | Last Updated: Apr 24 2019 9:57PM
चाफळ : राजकुमार साळुंखे 

चाफळ (ता. पाटण) येथील श्रीराम मंदिरास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पहिल्या वर्षी सुमारे दोन कोटींचा निधी प्राप्‍त झाला होता. मात्र, गेल्या चार वर्षापासून श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शासनस्तरावर पाठपुरावाच होऊ शकलेला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध झाला नसून चाफळ परिसराचा विकास खुंटला आहे.

सन 2014 आणि 2019 मधील चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. त्यानतंर चाफळ श्रीराम देवस्थान ट्रस्ट व चाफळ ग्रामपंचायत यांच्यात योग्य समन्वयच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सन 2015 पासून निधी प्राप्‍त व्हावा, यासाठी शासनस्तरावर कागदपत्रांची पूर्तताच होऊ शकली नाही. त्यामुळेच ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्‍त होऊनही चाफळला एक रूपयाही निधी मिळालेला नाही.

श्रीराम मंदिरास पहिल्या वर्षी पर्यटन ब वर्ग दर्जा मिळाल्यानतंर दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या परिसराचा विकास होण्यास सुरुवात झाली होती. प्रथम आलेल्या निधीतून मंदिराच्या पाठीमागील व समोरील घाटावरील परिसराचा चांगल्या प्रकारे विकास करण्यात आला. त्यामुळे मंदिरात मुक्कामास येणार्‍या भाविकांसाठी     सोय झाली आहे. 

दररोज शेकडो वाहने राज्यासह परराज्यातून मंदिरात दर्शनासाठी दखल होतात. मुबलक पाण्याची सोय व चांगली राहण्याची सोय अल्प दरात असल्याने अनेक भाविक मुक्कामाला येत आहेत. पर्यटनस्थळाचा ब वर्ग प्राप्त झाल्यापासून मंदिरात येणार्‍या पर्यटकांच्यात वाढच होत आहे. मात्र असे असूनही केवळ कागदपत्रे सादर न केल्याने निधी न मिळणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने आता योग्य ती दक्षता घेत कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. 

तसेच या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन निधी मिळवण्यासाठी शासनस्तरावर कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे. भविष्यातही हीच स्थिती कायम राहिल्यास चाफळचा विकास खुंटण्याबरोबर पर्यटन स्थळाला बकाल अवस्था प्राप्‍त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.