Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Satara › जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ अशा विविध घोषणांच्या दणदणाटात जिल्ह्यात तिथीप्रमाणे मंगळवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातील विविध मंडळांतील तरुणांनी विविध गडकोट किल्ल्यांवरून वाजतगाजत शिवज्योती आणल्या. फलटण येथे शिवजयंतीच्या  शोभायात्रेत दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाप्रमाणेच खास तयार करण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ हा खास आकर्षण ठरला, तर पाचगणी येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने  ढोलांचा छबिना, भव्य मोटार रॅली, हाती भगवे झेंडे आणि शाही मिरवणूक काढून ‘जय भवानी...जय शिवाजी...’च्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली.

जिल्ह्यात या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योती आणण्याबरोबरच विविध उपक्रमही राबवण्यात आले. तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला अनेक मंडळे व संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगड, किल्ले प्रतापगड, सज्जनगड, पन्हाळा, शिवनेरी, सिंहगड, अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्यांवर जिल्ह्यातील विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवज्योत आणण्यासाठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या विविध परिसरातील मंडळाचे कार्यकर्ते महामार्गावरून शिवज्योत घेवून धावताना दिसत होते.

सकाळपासूनच सातारा शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सव मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमाबरोबर प्रतिमापूजन, जन्मकाळ, आकर्षक विद्युत रोषणाई, पोवाडा, शिवचरित्रावर व्याख्यानासह   धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील  मंडळांनी सकाळपासूनच चौका-चौकात शिवचरित्रावर आधारीत पोवाडे लावले होते तसेच भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे  जिल्ह्यासह सातरा शहरात शिवमय वातावरण तयार झाले होते.

सातारा शहरातील विविध मंडळांनी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, गुलाल फुलांची उधळण करत ऐतिहासिक अशा शाही मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकींमध्ये पारंपारिक वेशभुषेतील चित्ररथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकांमध्ये महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पोवईनाका येथील शिवतिर्थावर सकाळपासूनच जिल्ह्यासह शहरातील विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करून अभिवादन केले.

 

Tags : satara, satara news, Shiv Jayanti, Celebrating,