Thu, Aug 22, 2019 08:09होमपेज › Satara › दक्षिण आफ्रिकेतही शिवजयंती साजरी

दक्षिण आफ्रिकेतही शिवजयंती साजरी

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:17PMसातारा : प्रतिनिधी

सह्याद्रीच्या मावळ्यांनी मलावी (दक्षिण आफ्रिके)ची राजधानी लिलोंग्वे येथे शिवजयंती उत्साहात  साजरी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतही छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा गायली गेली आहे. 

दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रम डिस्कव्हरी मेडिकल सेंटरच्या प्रांगणात पार पडला. सायंकाळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या घोषणा देऊन त्यांना आदराने मानवंदना दिली. या शिवजयंती सोहळ्यास महिला वर्गाची उपस्थिती होती. महिलांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे औक्षण केले.

शिवजयंती महोत्सवाची प्रेरणा दीपक सुरेश भोसले (मु. खालचे चाहूर, पो. भुईंज) व सचिन पाटील (जळगाव) यांच्या संकल्पनेतून पुढे आली. कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी संजय मडीवाल (इचलकरंजी), विजय हत्तीकर (येळगाव), प्रशांत कुलकर्णी (क. महांकाळ), डॉ. महेश तावरे (मुंबई), झहीर खान (पुणे), चिन्मय खटावकर (पुणे), प्रशांत ठाकूर (इंदौर) यांनी अथक परिश्रम घेतले. 

लिलोंग्वेमध्ये 25 मराठी कुटुंबे...

शिवजयंती उत्सव पार पाडण्यासाठी सुनील गोडांबे, महेंद्रसिंग ठाकूर, हेमंत भगत व विजय पठारे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या लिलोंग्वेमध्ये 25 मराठी कुटुंबे आहेत. सर्वजण गुण्यागोविंदाने व सौख्याने राहतात. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी संबंधित सांस्कृतिक व कला कार्यक्रम आय.सी.सी. क्‍लब येथे आयोजित केला आहे.