Thu, Jul 18, 2019 21:15होमपेज › Satara › सातार्‍यात अवतरली ‘शिवशाही’

सातार्‍यात अवतरली ‘शिवशाही’

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा जयघोषांनी ढोल-ताशांच्या गजरात, शिंग-तुतार्‍यांच्या निनादात, सनई-चौघड्यांच्या  सुरात, आकर्षक चित्ररथांसह व हजारो शिवभक्‍तांच्या उपस्थितीत निघालेल्या शिवजयंतीच्या शाही मिरवणुकीने राजधानी सातार्‍यात साक्षात ‘शिवशाही’च अवतरल्याचा भास झाला. यंदा अभूतपूर्व अशी निघालेली दिमाखदार मिरवणूक लक्षवेधक ठरली. 

अवघा आसमंत  ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला. सातार्‍यातील पोवई नाक्यावर असणार्‍या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी रात्री 12 च्या ठोक्याला आदरांजली वाहून शिवजयंतीच्या महोत्सवास प्रारंभ झाला. राजवाडा तसेच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेला. शिवजयंती महोत्सव राजधानी सातारा यांच्यातर्फे महिला व युवतींच्या वतीने किल्‍ले अजिंक्यतारा येथून शिवज्योत पोवई नाका येथे आणण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता सार्वजनिक शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. पहाटेपासून शिवपराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे व गाणी लावण्यात आली होती. सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावण्यात आल्या होत्या. आकर्षक रांगोळ्यांनी मंडप परिसर सुशोभित करण्यात आला. 

शहरातील  सर्व मुख्य चौकांमध्ये गणेश मंडळांनी भव्य स्वागत कमानी उभारल्या होत्या.  या कमानीच्या दोन्ही बाजूस किल्ल्याचे बुरूज केले होते. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे देखावे तयार करून रात्री लेझर लाईटचा झगमगाट करण्यात आला होता. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’, ‘स्वराज्याची शपथ’ आणि राज्याभिषेक सोहळ्याचे देखावे इतिहासाची साक्ष देत होते.

राजवाडा येथे सातारा नगरपालिकेच्यावतीने आकर्षक महालाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. येथील गांधी मैदानावरून यंदाही पालिकेच्यावतीने  शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशे आणि ध्वज पथकातील कलाकारांनी आपली कला सादर केली.  त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे झांजपथक, हलगी पथकही सहभागी झाले होते. राजवाडा येथे सातारा नगरपालिकेच्यावतीने भरवण्यात आलेल्या  किल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

गोलबागेतील श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्यास   नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, साविआचे प्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या सौ. स्मिता घोडके, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नियोजन सभापती सौ. स्नेहा नलवडे, सौ. सुजाता राजेमहाडिक, अलाउद्दीन शेख, किशोर शिंदे, नगरसेवक आदि उपस्थित होते. त्यानंतर राजवाडा येथे शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला.  मिरवणुकीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते. 

गांधी मैदानावरुन निघालेल्या शाही मिरवणुकीच्या स्वागतासाठी राजपथाच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. या मिरवणुकीत शहरातून आलेल्या विविध ठिकाणच्या पालखी, चित्ररथ सहभागी झाले. मुख्य चौकात शिवजयंतीवर आधारित केलेली आरास लक्षवेधी ठरली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध चित्ररथांनी  सांस्कृतिक परंपरा तसेच शिवपराक्रमाच्या ऐतिहासिक घटना दाखवणारे देखावे सादर केले. त्यामुळे अवघी शाहूनगरी शिवमय झाली. करंजेतील श्रीपतराव पाटील हायस्कूलने बेलवाडीचा मलाम्मा देसाईचा सन्मान देखावा सादर केला. अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळेने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हा चित्ररथ सादर केला.

आधी लगीन कोंढाण्याचे हा चित्ररथ जिजाऊ न.पा.शाळा 23 ने सादर केला. न.पा. शाळा नं. 13, 16, 17 तसेच अनंत इंग्लिश स्कूलने शिवपराक्रमावर चित्ररथ सादर केला.  भवानी विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजने  सादर केलेला रायरेश्‍वर प्रतिज्ञा हा चित्ररथ लक्षवेधक ठरला. सातारा नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानावरील चित्ररथाने जनजागृती केली. काचपुरीचा खेळ न.पा. शाळा नं. 2, 20, 25 ने सादर केला. जानकीबाई प्रेमसुखलाल झंवर शाळा, बापूसाहेब चिपळूणकर याही शाळांचे चित्ररथ सहभागी झाले होते.  शिवराज्याभिषेक दिन, शिवजन्म आदि शिवकालावर आधारित चित्ररथाद्वारे सादर केलेले जिवंत देखावे पाहण्यासाठी शिवप्रेमींची  गर्दी लोटली होती. मोती चौक-राजपथ-शाहू चौक-पोवईनाकामार्गे शाहू मिरवणूक सायंकाळी पोवईनाक्यावर आली. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले. राजवाडा, गोलबाग, नगरपालिका येथे आकर्षक विद्युत रोषणाई  केल्याने परिसर उजळून निघाला. शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा पालिकेचे कार्यालयही नटून गेले होते.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक मंडळांनी राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड, विशाळगड, मुरुड-जंजिरा, सज्जनगड यासह शिवस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांवरून शिवज्योती दौडत आणल्या. यानिमित्ताने ठिकठिकाणी विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवपराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे, व्याख्याने यासह विविध सामाजिक उपक्रम थाटात राबवण्यात आले.