Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Satara › विठ्ठल नामाच्या जयघोषाने करहरनगरी दुमदुमली

विठ्ठल नामाच्या जयघोषाने करहरनगरी दुमदुमली

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 12:02AMकुडाळ : प्रतिनिधी  

जावली  तालुक्यातील तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर करहर येथे श्री विठ्ठल- रखुमाईच्या जयघोषात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

ज्या भाविकांना या दिवशी पंढरपूरला जाता येत नाही, असे जिल्ह्यातील हजारो भाविक प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणार्‍या करहर येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होतात. हीच माझी पांढरी म्हणत जिल्हासह इतर भागातूनही हजारो भाविकांनी सोमवारी करहर येथे हजेरी लावून पांडुरंगाचे दर्शन घेतले 

सकाळपासून सुमारे 40 ते 50 हजार वारकरी भाविकांनी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रांगा लावून दर्शन घेतले. दिवसभरात जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा, आदी भागातून गावातून अनेक दिंड्या आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम संत मुक्ताई, संत नामदेव महाराज अशा विविध संतांच्या दिंड्या करहरमध्ये टाळ मृदूंगाच्या गजरात  दाखल होत होत्या.

श्री विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी करहर नगरी दुमदुमून गेली होती. सकाळी आ. शिवेंद्रराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांच्या   हस्ते सकाळी 7 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मूर्तींवर  अभिषेक करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर , उपाध्यक्ष वसंत मानकुमरे  यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती  दत्ता गावडे,  जावली बँकेचे चेअरमन चंद्रकांत गावडे, व्हाईस चेअरमन प्रकाश मस्कर, तेजस शिंदे, सौरभ शिंदे, नरेंद्र यादव पाटील, सरपंच सर्जेराव यादव, उपसरपंच विजय यादव,  राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष शेडगे, प्रकाश गोळे, समाधान पोपळे, श्रीहरी गोळे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. 

दुपारी तालुक्यातील विविध शाळांची मुले आपल्या शाळेतून संतांची परंपरा राखत चित्ररथ सजवून पारंपरिक वेशभूषेत करहर नगरीत दाखल झाली. बालचमुंच्या पायी दिंड्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. कीर्तन, भजनाच्या निनादामध्ये आषाढी एकादशी करहरमध्ये भक्तिभावाने साजरी होताना महिला वारकरी व लहान मुले, महिलांच्या फुगड्या, फेर या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते 

जावली तालुक्याची अर्थवाहिनी ह भ प कळंभे महाराज जावली सहकारी बँकेच्या सर्व संचालकांमार्फत येणार्‍या सर्व वारकरी भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व भाविकांना एकादशीच्या शुभेच्या दिल्या. जावली बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर,  विक्रम भिलारे, भानुदास पार्टे, जाधव, शिवसेनेचे रवी परामने,  एकनाथ ओंबळे, करहरचे सरपंच, सर्जेराव यादव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले. मंदिर परिसरात हजारो भक्तांनी दिवसभर रांगा लावून दर्शन घेतले. यावेळी मेढा पोलिस सपोनी जीवन माने, भुईंज सपोनि बाळासाहेब भरणे, 45  पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

राजपुरी,खिंगर व आंब्रळ येथून आलेल्या पालख्या आदल्या दिवशी काटवली येथे येतात. या ठिकाणी येथील विठ्ठल मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न होतात. वै. दत्तात्रय कळंबे महाराजांच्या परंपरेनुसार सोमवारी सकाळी 9 वाजता काटवली येथून पायी वारीस प्रारंभ झाला. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी व चित्ररथाचे पूजन वसंतराव मानकुमरे यांच्या पत्नी सौ. मानकुमरे,  डी. एम. के. जावली बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हाती भगव्या पताका, मुखी विठ्ठलाचा धावा आणि टाळ मृदंगाचा गजर करीत ही वारी बेलोशी येथील कळंबे महाराजांच्या समधी स्थळावर आली. कळंबे महाराज समाधी मंदिरात भजनाचा गजर झाला. याठिकाणी जावली बँक परिवाराच्यावतीने  महाराजांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर दापवडी येथे रिंगण झाले तर महू धरणावरील भव्य रिंगण सर्वांचेच आकर्षण ठरले. या रिंगणात धावलेला अश्व सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

करहरमध्ये दिंडी आल्यावर काटवली, बेलोशी आणि दापवडी येथील पालख्यांचे स्वागत करण्यात आले. पालख्या आणि  करहर येथील रथावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली.   प्रकाश मस्कर, विक्रम भिलारे, सभापती शिर्के, तहसीलदार रोहिणी आखाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.