Fri, Sep 21, 2018 01:43



होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल

सावकारीप्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:33PM



सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात सावकारीचा पाश अद्यापही घट्ट असल्याचे आणखी समोर येत असून शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये नुकताच अटक झालेला अजमेर मुल्‍ला याचाही समावेश असून या प्रकरणातील तक्रारदार हे बी.ई. सिव्हिल इंजिनिअर असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.अजमेर अकबर मुल्‍ला (रा.नागठाणे), लाला पंडित (रा. सातारा), सचिन नलवडे व अनोळखी एक या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संतोष कृष्णात घाडगे (वय 41, मूळ रा. कामेरी, सध्या रा.सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावकारी, जबरी चोरीची ही घटना डिसेंबर 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत बारावकरनगर, आशा कॉलनी, शिवराज पेट्रोलपंप परिसर व फिर्यादीच्या राहत्या घरी घडलेली आहे. संशयितांनी आपआपसात संगनमत करुन तक्रारदार यांना व्याजाने पैसे दिल्यानंतर त्याची सक्‍तीने वसुली केली आहे. यावेळी तक्रारदार यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली असून घरातून जबरदस्तीने 5 लाख रुपये नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळ व व्याजाची रक्‍कम 3 लाख रुपये होत होती.

दरम्यान, सातार्‍यात खंड्या धाराशिवकर याच्या टोळीने धुडगूस घालत अनेक उच्च शिक्षितही सावकारी पाशात अडकल्याचे समोर आले आहेे. मंगळवारी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिव्हील इंजिनिअरही सावकारीने त्रस्त असल्याचे समोर आल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात सावकारीची पाळेमुळे घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.