Mon, Aug 19, 2019 17:44होमपेज › Satara › पुणे एटीएसकडून सातार्‍यात पुन्हा ‘रेड’

पुणे एटीएसकडून सातार्‍यात पुन्हा ‘रेड’

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसातारा : प्रतिनिधी

नालासोपारा येथील बॉम्ब स्फोटके प्रकरणात सातारच्या सुधन्वा गोंधळेकरचा समावेश असल्याचे समोर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे एटीएसने गुरुवारी रात्री सातार्‍यात म्हसवे परिसरात छापा टाकला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात सातारा शहर कर्नाटक एसआयटीच्याही ‘रडार’वर असून, गौरी लंकेश हत्याप्रकरणात एक क्‍लू साताराशी संबंधित असल्याचे समोर येत आहे.

मुंबईतील नालासोपारा येथे दि. 10 ऑगस्ट रोजी वैभव राऊत याच्या घरात मुंबई एटीएसने छापा टाकल्यानंतर त्याच दिवशी याप्रकरणात साताराच्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली. त्याच्या पुणे येथील घरातून बंदुका, पिस्तूल जप्‍त करण्यात आले. या प्रकरणातूनच पुढे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मोठा सुगावा पोलिसांना लागला. कमालीची गुंतागुंत असणार्‍या या संवेदनशील प्रकरणात मुंबई, पुणे एटीएस व सीबीआय कारवाई करत असतानाच पुणे एटीएसने सुधन्वाच्या घरावर दि. 14 ऑगस्ट रोजी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी घरातून कागदपत्रांसह काही वस्तूही ताब्यात घेतल्या. लेखक, विचारवंत यांच्या हत्येचा उलगडा होत असतानाच कर्नाटक एसआयटीही गौरी लंकेश हत्या प्रकरणात सर्व बाबी पडताळून पाहत आहेत.

दरम्यान, पुणे एटीएसने दि. 14 रोजी सातार्‍यात सुधन्वा गोंधळेकरच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर गुरुवार, दि. 23 रोजी पुन्हा एकदा पुणे एटीएसचे पथक सातार्‍यात येवून गेलेे. याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. करंजे-म्हसवे येथे पुणे एटीएसने कारवाई केली आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या घराचीही झाडाझडती घेतली असता आक्षेपार्ह काही सापडलेले नाही मात्र तपासासंबंधी काही कागदपत्रे, वस्तू पोलिसांनी जप्‍त केल्या आहेेत. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पुणे एटीएसने कसून चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पुणे एटीएस आतापर्यंत सातार्‍यात दोनवेळा येवून गेल्याने आणखी काहीजण रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे? ही लिंक कुठेपर्यंत पोहचली आहे? नेमका कोणाचा कोणता रोल आहे? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.