Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Satara › पानटपरीत सापडली काडतुसे

पानटपरीत सापडली काडतुसे

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 11:30PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील तांदुळआळी परिसरातील शिवराज पान टपरीमधील चालकाकडे 303 बोअरचे दोन जिवंत राऊंड (बंदुकीच्या गाळ्या) सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित शिवा बाळू अहिवळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) ही कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी, मंगळवारी एलसीबीचे पोलिस अधिकारी, कर्मचारी सातार्‍यात ठिकठिकाणी गस्त घालत होते. यावेळी तांदुळआळी परिसरातील एका पानटपरी चालकाकडे बंदुकीच्या विनापरवाना गोळ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. शिवराज पानटपरीची झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयिताला ताब्यात घेतले व दोन्ही जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईवेळी परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून संशयितांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण फडतरे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलिस हवालदार प्रवीण फडतरे, शरद बेबले, निलेश काटकर, एम.एम.देशमुख, एम.एन.मोमीन, एस.पी.जाधव, सुरेंद्र पानसांडे, नितीन गोगावले यांनी कारवाईत सहभाग घेतला.

रायफलच्या गोळ्यांवर कंपन्यांचा उल्‍लेख

पोलिसांनी जप्‍त केलेल्या दोन्ही गोळ्यांची पाहणी केली असता या दोन्ही गोळ्या वेगवेगळ्या आहेत. या गोळ्या 303 बोअर रायफलसाठी वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित बंदुकीच्या एका ‘गोळीवर 1943 सीएसी कंपनी’ तर दुसर्‍या गोळीवर ‘1944 जीआयआय कंपनी’ असे नाव कोरलेले आढळले आहे. हे दोन्ही राऊंड जप्‍त केल्यानंतर एलसीबीच्या पोलिसांनी याबाबतची खातरजमा पोलिस मुख्यालयातील आयुधिकप्रमुख (शस्त्रागारांचे तज्ञ) पोलिस एस.एस.जाधव यांच्याकडून करुन घेतली असून त्यानुसार त्यांनी दाखलाही दिला आहे.

बंदुकीच्या गोळ्या कुठून आल्या?

एलसीबीच्या पोलिसांनी अटक केलेल्या शिवा अहिवळे याला ताब्यात घेवून त्याची गुन्हेगारीवृत्तीची माहिती घेतली. संशयितावर आणखी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिवाने त्या दोन्ही बंदुकीच्या गोळ्या कुठून आणल्या? त्या किती रुपयांना विकत घेतल्या? विक्री करणार्‍या टोळीमध्ये कोणकोण आहे? सातार्‍यात आतापर्यंत अशा किती बंदुकीच्या गोळ्या विकल्या? बंदुकीबाबत काही माहिती आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले असून त्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.