Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Satara › कबड्डीमुळे करिअरची संधी

कबड्डीमुळे करिअरची संधी

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:53PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कबड्डीसह मैदानी खेळांमुळे मुलींना करिअरच्या अनेक वाटा निर्माण झाल्या आहेत. मला केंद्र सरकारचा ‘अर्जुन’ पुरस्कारही कबड्डीमुळेच मिळाला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणूनही मला कबड्डीमुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील मुलींनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार अभिलाषा शशिकांत म्हात्रे यांनी केले आहे. 

अभिलाषा म्हात्रे मुंबई उपनगर जिल्हा संघाकडून 65 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत खेळत आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता दैनिक ‘पुढारी’शी बोलताना त्या म्हणाल्या, मी गेली 17 वर्षे कबड्डी खेळत आहे. देशपातळीवर मी गेली 12 वर्षे राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. आज कराडात शिवाजी स्टेडियमवर आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत खेळताना आपणास आनंद होत आहे.  

स्पर्धेचे खूप चांगले आयोजन करण्यात आले आहे. मी सहावेळी देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मला मिळाली. या स्पर्धेत सर्व सहकार्‍यांमुळे विजेतेपद मिळवण्यात यश मिळाले. 2015 साली केंद्र सरकारकडून ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त झाला. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.

कबड्डीमुळेच मला नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे मुलींनी विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी कबड्डीकडे वळणे आवश्यक आहे. कबड्डीत करिअरच्या खूप वाटा उपलब्ध झाल्या आहेत. चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षक तसेच सोयीसुविधा मिळत आहेत. त्यामुळे कबड्डी हा खेळ करिअर म्हणून निवडत खूप मोठी पायरी गाठू शकता, असे आवाहन अभिलाषा म्हात्रे यांनी महिला खेळाडूंसाठी विशेषत: ग्रामीण मुलींना केले आहे.