Tue, Jul 07, 2020 21:46होमपेज › Satara › एस.टी. स्टँडच्या सीसीटीव्हीत पाकीट चोर युवती कैद

सातारा : पाकिटमार कॉलेज गर्लला अटक (video)

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 19 2018 1:37AMसातारा : प्रतिनिधी

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून बिनधोकपणे पैशांची पाकिटे चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झाली असून, स्टँड चौकीतील पोलिसांनी तिला एका गुन्ह्यात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. स्टँडमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवले गेल्याने ही कारवाई होण्यास मदत झाली असून, ज्यांची पर्स, कागदपत्रे चोरी झाली आहेत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दीक्षा भोसले (लिंब गोवे, ता. सातारा) असे संशयित चोरी करणार्‍या युवतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अक्षदा जाधव ही युवती तिच्या आजीसोबत शिवाजीनगर येथे जाण्यासाठी सातारा एस.टी. स्टँडवर मंगळवारी दुपारी आली होती. 

गर्दीच्या वेळी एस.टी.मध्ये जात असताना अज्ञात चोरट्याने तिची पैशांची व कागदपत्रांची पर्स चोरी केली. ही बाब अक्षदाच्या लक्षात आल्यानंतर तिने एस.टी स्टँड पोलिस चौकीमध्ये धाव घेतली. चौकीतील पोलिस हवालदारांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित दीक्षा भोसले हिने पर्स चोरल्याचे फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबुली दिली. दरम्यान, चोरीचे आणखी असे प्रयत्न केले असून तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संशयित युवती सातारा येथे एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित युवतीकडून चोरीचे कृत्य घडल्याने  खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे, अरुण दगडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.