Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Satara › खंडणीखोर, सावकारांविरुद्ध धडक मोहीम 

खंडणीखोर, सावकारांविरुद्ध धडक मोहीम 

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:55AMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात खंडणीखोर, सावकारी, दरोडा व जबरी चोरी करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उभारली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांची याबाबत करडी नजर असून  तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांनी निर्भयपणे समोर येऊन तक्रारी द्याव्यात. त्यांना नि:शुल्क पोलिस बंदोबस्त दिला जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. दरम्यान, ज्यांना मोक्का लावला आहे व तडीपार करण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध आणखी तीव्र मोहीम आखली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनोद  ऊर्फ बाळू खंदारे, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, अनिल कस्तुरे, आकाश ऊर्फ बाळ्या खुडे, दत्ता जाधव यांनी जर दरोडा, जबरी चोरी, खंडणी असे गुन्हे केले असतील, परंतु त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास भीती वाटत असेल, तर अशा तक्रारदारांनी घाबरू नये.  मोक्कांतर्गत अटक करण्यात आलेला गुंड दत्ता जाधव याच्याविरुद्ध अटकेच्या कारवाईनंतर 8 तासांच्या आत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. यासाठी तक्रारदारांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात तक्रार द्याव्यात. प्रसंगी तक्रारदारांचे   नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. गुंड दत्ता जाधव  याच्याविरुध्द सावकारीप्रकरणी मोक्का लागल्यानंतर सातारा पोलिसांनी प्रतापसिंहनगरमधून त्याची गचांडी धरुन अटक केली. दत्ता जाधव याच्याविरुध्द यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्यातील आणखी केसेस कोर्टात सुरु आहेत. त्याची अट्टल गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पाहून अनेकदा तक्रारदार त्याच्याविरुध्द तक्रार देण्यास धजावत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी कोणतीही भिती बाळगू नये, असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. महिला तक्रारदार असल्यास महिला पोलिसांकडूनच गुन्ह्याचा तपास केला जाईल. तसेच तक्रार दिल्यानंतर पोलिस बंदोबस्त आवश्यक असल्यास तोही नि:शुल्क दिला जाईल. दरम्यान, पीडित उद्योजक, स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

 

Tags :  satara, District, Police Chief, Sandeep Patil, money lenders