Wed, Apr 24, 2019 12:18होमपेज › Satara › ‘कॉलबॉय’च्या तपासाचे घोडे अडले कुठे?

‘कॉलबॉय’च्या तपासाचे घोडे अडले कुठे?

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:38PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

उच्चभ्रू सोसायटींमधील महिलांसाठी बॉडी मसाजच्या नावाखाली कॉलबॉयचा प्रकार सातार्‍यात समोर आल्याच्या घटनेला  एक महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून तपास ठप्प आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल असतानाही कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित फोन नंबरची तांत्रिक माहिती मागवली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सातार्‍यातील एका युवकाला डिसेंबर महिन्यात युवतीचा फोन आला होता. संबंधित  युवतीने उच्चभ्रू महिलांना बॉडी मसाज देण्याची ऑफर करून त्यासाठी 50 हजार रुपये मिळतील, असे  सांगितले. ती युवती एका क्‍लबमधून बोलत असल्याचे सांगून मीटिंगसाठी अंतिम बोलणी झाल्यानंतर त्यातील 20 टक्के रक्‍कम क्‍लबला व उर्वरित रक्‍कम कॉलबॉयला, अशीही ऑफर संबंधित युवतीने क्‍लबच्या माध्यमातून दिली होती. या सर्व माहितीनंतर सातार्‍यातील युवक थक्‍क झाला व त्याने घडलेल्या घटनेबाबत  तक्रार केली. संबंधीत मोबाईल क्रमांक व घटनेबाबत  शाहूपुरी पोलिसांकडे रितसर तक्रार दिली होती.

एरव्ही तक्रारदार नसल्याने पोलिसांना मर्यादा येत असतात. या प्रकरणात तक्रारदाराने मोठ्या हिमतीने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती देवून तक्रार अर्ज केलेला आहे. या सर्व घटनेची पोलखोल करावी, अशी मागणी त्याने केली आहे. दुर्देवाने पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. यामुळे या प्रकरणाचा छडा कधी लागणार? या टोळीमध्ये कोण कोण आहे? टोळीमध्ये सातार्‍यातील कोणी आहे का? पोलिस नेमकी कारवाई कधी करणार? असे सवाल उपस्थित झाले आहेत.