होमपेज › Satara › औंध भवानी संग्रहालयावर आता सीसीटीव्हीचा वॉच 

औंध भवानी संग्रहालयावर आता सीसीटीव्हीचा वॉच 

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:04PMऔंध  : वार्ताहर

शासनाच्या पुरातत्व विभागाने राज्यातील 12 वस्तुसंग्रहालयापैकी 5 वस्तुसंग्रहालयामधील मौल्यवान वस्तू, चित्रे, पेंटिंग्ज  व अन्य साहित्याच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औंध येथील श्रीभवानी वस्तूचित्रसंग्रहालय व ग्रंथालय परिसरात सुमारे दिड कोटी रुपये खर्चून 230 नाईट व्हीजन कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना औंध येथील श्रीभवानी चित्र व वस्तुसंग्रहालय तसेच ग्रंथालयाचे उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी सांगितले राज्यात 12 वस्तुसंग्रहालये आहेत. यामधील 5 संग्रहालयांमध्ये नाईट व्हीजन कॅमेरे  बसविले जाणार आहेत. त्यामध्ये नागपूर, औंध, सांगली व कोल्हापूर येथील वस्तू व चित्रसंग्रहालयांचा समावेश आहे. औंध येथील  संग्रहालयात सर्वसाधारणपणे दिड कोटी रुपये खर्चून  दोनशे तीस नाईट व्हिजन कॅमेरे  बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संग्रहालय परिसरातील  आतिल व बाहेरील परिसर सुरक्षित झाला आहे. संग्रहालयामधील एकूण 18 दालनांमध्ये प्रत्येकी चार कॅमेरे असे एकूण 72 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन कोर्ट यार्ड व एका मोठ्या हॉलमध्ये असे 30 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्ट्राँग रुम, ऑफिस, बाहेरील ऑफिस, स्टोअर रुम, व्हरांडा, संग्रहालय इमारतीमधील दोन्ही गॅलरत  सुमारे 75 कॅमेरे तसेच संग्रहालयाच्या बाहय  परिसरातील पुढील व मागील बाजूस दोन मोठे डोम कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

या कॅमेर्‍यांमुळे संग्रहालयाच्या दोन्ही इमारतींमधील सुमारे सहा हजार दुर्मिळ चित्रे, पेंटिंग्ज, शिल्पे, चंदनी वस्तू तसेच विविध प्रकारच्या हस्तीदंती, संगमरवरी वस्तू आता कॅमेर्‍याच्या कक्षेत आल्या आहेत. त्याचबरोबर अठरा हजाराची ग्रंथसंपदा  सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. हे सर्व कॅमेरे चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. याबाबतचे सर्व काम पूर्ण झाले आहे. कॅमेरे ऑपरेट करण्यासाठी संग्रहालयाचे प्रवेशद्वार, उपअभिरक्षक कार्यालय, बाहय कार्यालय येथे प्रत्येकी एक  स्क्रीन तसेच संग्रहालयाच्या मध्य भागातील कंट्रोल केबिनमध्ये चार स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संग्रहालय कर्मचारी व सिक्युरिटी गार्डवरील ताण फार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
  आता संग्रहालय पूर्णपणे सुरक्षित झाले असून सीसीटीव्ही यंत्रणा मागील काही दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.