Tue, Jul 23, 2019 19:42होमपेज › Satara › बामणोली आरोग्य केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

बामणोली आरोग्य केंद्रावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 23 2018 9:08PMबामणोली : वार्ताहर

बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली  असून त्यामुळे केंद्रात चालणार्‍या सर्व घडामोडींवर आता बारीक लक्ष राहणार आहे. हे सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्याने आता  अधिकारी व कर्मचार्‍यांवरही अंकुश आला असून रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 

जि.प. सदस्या सौ. अर्चना रांजणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत सीसीटीव्ही  यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने डॉ. मोरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांच्याकडे पाठपुरावा करून बामणोली आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही बसवले.

आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना आता चाप बसणार आहे तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीत डॉक्टरला जे लक्ष द्यावे लागायचे ते आता कमी होणार आहे. सी सी टीव्ही यंत्रणेमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुरळीत पणा येणार असून कामकाज सुलभ होण्यास मदत होणार आहे. सीसीटीव्हीमुळे सर्व कामकाज रेकॉर्ड होत  असल्याने कारभारातील रटाळपणा जाणार आहे. तसेच कर्मचार्‍यांवर वॉच राहणार असल्याने कामातील अळमडळम कमी होण्यास मदत होणार आहे. 

हळूहळू बामणोलीचे आरोग्य केंद्र पूर्वीपेक्षा वेगळ्या प्रकारे कार्यरत राहणार असून डॉ. मोरे यांच्या सहकार्याने डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना सुविधा  उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, बामणोली केंद्राचे अत्याधुनिकरण होत असताना रूग्णवाहिकेची गरज पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रूग्णाल्याच्या कक्षेतील गावांकडून केली जात आहे.