Wed, Jul 17, 2019 00:46होमपेज › Satara › विलासपूरमध्ये आता चौकाचौकात सीसीटीव्ही

विलासपूरमध्ये आता चौकाचौकात सीसीटीव्ही

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:33PMकोडोली : वार्ताहर

सातारा शहरालगतच्या विलासपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दै. ‘पुढारी’चा चांगलाच बोलबाला झाला. ‘पुढारी’त मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘विलासपूरमध्ये स्ट्रीट लाईट बंद चोर्‍या सुरु’ या मथळ्याखालील बातमीचा संदर्भ देत याप्रश्‍नी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी उचलून धरल्याने अखेर चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे व स्ट्रीट  लाईट डी. पी.मध्ये स्वयं चलित टायमर बसवण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी ‘पुढारी’ व ग्रामपंचायतीचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

विलासपूरची ग्रामसभा सरपंच बाळासाहेब पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली, उपसरपंच महेश कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामसभेत मागील इतिवृत्त वाचन व त्यास मान्यता दिल्यानंतर दै. ‘पुढारी’मध्ये दि. 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत उपस्थित ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईटबाबतचा मुद्दा लावून धरला. ग्रामस्थांनी ‘पुढारी’मुळेच हा प्रश्‍न चव्हाट्यावर आला असून आता तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी वारंवार होणार्‍या चोर्‍यांसंदर्भात सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना चांगलेच धारेवर धरले. काहीकाळ हंगामा होवून ग्रामपंचायतीच्यावतीने लवकरच विलासपूरच्या मुख्य चौकामधून सीसीटीव्ही कॅमेरे व स्ट्रीट लाईट चालू - बंदचा डी.पी.मध्ये स्वयं चलित टायमर बसवण्यात येतील, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी दै. ‘पुढारी’ व ग्रामपंचायतीला धन्यवाद दिले. ‘पुढारी’मुळेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

त्यानंतर विषय पत्रिकेवरील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी निवड करणे,  बेटी बचाओ,  मिळकतीवर पती व पत्नी दोघांचीही नावे समाविष्ट करणे, 14 व्या वित्तआयोगातील 2019-20 मधील सूचवण्यात आलेल्या कामांना मंजुरी, स्वच्छ भारत मिशत अंतर्गत शौचालय नसलेल्यांची यादी करणे, मुलींचे शिक्षण, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, विसर्जन व निर्माल्य व वृक्ष लागवड या विषयावर सदस्य व ग्रामस्थ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होवून संबंधित विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, ग्रामसभेत ग्रामस्थांनी ऐनवेळच्या विषयात सुचवलेल्या तक्रारींबाबत ग्रामपंचायत पातळीवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल,  असे सरपंच पिसाळ व उपसरपंच कुलकर्णी यांनी सांगितले.

विषय पत्रिकेवरील व इतीवृत्तांचे वाचन ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांनी केले. महेश कुलकर्णी यांनी आभार मानले.