Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Satara › ४८ ग्रामपंचायतींचे धूमशान 

४८ ग्रामपंचायतींचे धूमशान 

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:50PMसातारा : प्रतिनिधी

ऑक्टोबर ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी दि. 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी दि. 5 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकांमुळे ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.

कराड तालुक्यातील सर्वाधिक 16 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून, त्यामध्ये जुंजारवाडी, बाबरमाची, कामेटे, काळेवाडी, कोरीवळे, मुनावळे, नरसी, शिंघणवाडी, तुळसन, वनवासमाची (सदाशिवगड), विठोबाचीवाडी/ विठ्ठलवाडी, पाचपुतेवाडी, नारायणवाडी, करंजोशी (हरपळवाडी), बाबरमाची (डिचोली) सावरघर (धावरवाडी) या ग्रामपंचायतींमध्ये जोरदार लढती पहायला मिळणार आहेत. खटाव तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार असून दरजाई, धाकटवाडी, पांढरवाडी, पवारवाडी, वाकनवाडी, वर्धनगड, कटगुण, कुरोली, पोफळकरवाडी या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय घमासान होणार आहे.

वाई तालुक्यातील 7  ग्रामपंचायतींचा समावेश असून शहाबाग, यशवंतनगर, धोम (पुन.), अमृतवाडी, वेळे, चांदवडी आणि पाचवड  या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीने निवडणूक लढवली जाणार आहे. पाटण तालुक्यात 6 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. मेंढ, खराडवाडी, नाणेगाव खुर्द, नेहंबेचिरंबे, लुगडेवाडी, येरफळे या ग्रामपंचायतींमध्ये लक्षवेधक लढती होणार आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. दुधगाव, सायघाट, दाभेमोहन, खरोशी आणि देवसरे   या ग्रामपंचायतींमध्ये चांगलाच  राजकीय सामना रंगणार आहे.

कोरेगाव तालुक्यातील 2  ग्रामपंचायतींचा समावेश असून बोधेवाडी (भाडळे), बोरीव या ग्रामपंचायतींचा राजकीय रागरंग पहायला मिळणार आहे.  जावली तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा समावेश असून गाळदेव आणि विवर या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. माण तालुक्यातील  दोरगेवाडी ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक  होणार आहे. याशिवाय अन्य तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही होत आहेत.

दरम्यान, या निवडणुकीनिमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यपदासाठी थेट निवडणूक होत आहे. निवडणूक लागलेल्या क्षेत्रात संबंधित पदाधिकार्‍यांना मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती करता येणार नाही. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे तहसीलदार कार्यालयात भरावे लागणार आहेत. आरक्षित प्रवार्गातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांकडे संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ऐन पावसाळ्यात राजकीय धामधूम सुरु होणार आहे. दहा-बारा दिवसांतच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने नेतेमंडळींकडून उमेदवारांची शोधाशोध सुरु झाली आहे. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणावर खर्च करु लागले आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अटीतटीच्या लढती पहायला मिळणार आहेत.