Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Satara › खर्चात आग्रही पण औषधे वेळेत मिळणार ना?

खर्चात आग्रही पण औषधे वेळेत मिळणार ना?

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 14 2018 12:13AMसातारा : प्रवीण शिंगटे

सातारा  जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यात पशुसंवर्धन विभाग आग्रही राहिला असला तरी  पशुवैद्यकीय  दवाखान्यांसाठी शितयंत्रे खरेदीची कार्यवाही सुरू आहे. तसेच औषधांची ऑर्डर दिली असून काही औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत सर्वच्या सर्व निधी खर्च होणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषद सेसमधून पशुसंवर्धन विभागाला 1 कोटी 51 लाख 65 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी  शितयंत्रे खरेदीसाठी 1 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार खरेदीची कार्यवाही सुरू आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांना  औषध पुरवण्यासाठी विविध औषध कंपन्यांना ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही औषधे जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली आहेत. मात्र ही औषधे मार्चएंडपर्यत जिल्ह्यात उपलब्ध होणार का?  जनावरांनाही औषधांसाठी हंबरडा फोडावा लागणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. श्‍वानदंश प्रतिबंधक लसीकरणासाठी  कोणतीही तरतूद केली नसली तरी लाभार्थ्यांच्या खर्चासाठी निधी दिला जात असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.

वैरण विकास बियाण्यासाठी 3 लाखाची तरतूद केली आहे.न्यूट्रीफीड बियाणे खरेदी करून सुमारे 500 हून अधिक लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. जंतनाशक औषधांची खरेदी कार्यवाही सुरू असून ही औषधे वेळेत उपलब्ध  होतील. साथरोग नियंत्रणासाठी 6 लाखाची तरतूद केली आहे. मात्र साथरोग नियंत्रणासाठी शासनाकडून  लाळखुरकतची वेळेत लस उपलब्ध होणार का? असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या गाई वासरांचे मेळावे व प्रदर्शनासाठी 2 लाखाची तरतूद करण्यात आली होती मात्र हा निधी प्रदर्शनासाठी खर्च झाला आहे. 

कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासंदर्भात लाभार्थी निवड करून तालुक्यांना याद्या दिल्या असल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले. मात्र लाभार्थ्यांनी स्वत: कडबा कुट्टी यंत्र खरेदी करून त्यांची बिले कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे. बिले सादर केल्यानंतर संबंधित यंत्राची पाहणी अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार आहे. पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यांतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात  अनुदान जमा करण्यात येणार आहेत.मात्र बहुतांश लाभार्थ्यांकडे वस्तु खरेदीसाठी एवढी रक्कम आणावयाची कोठून असा प्रश्‍न पडला आहे त्यामुळे हा निधी वेळेत खर्च होण्याची शक्यता कमी  आहे.

पशुसंवर्धन विभागाला  1 कोटी 51 लाख 65 हजार रुपयांचा निधी दिला असला तरी अनेक बाबींचा पुरवठा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दिलेला सर्वच निधी मार्चपर्यंत खर्च होईल असे डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.