Fri, May 29, 2020 12:35होमपेज › Satara › फुलपाखरू उद्यानाची पर्यटकांना भुरळ

फुलपाखरू उद्यानाची पर्यटकांना भुरळ

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 8:46PMसणबूर : तुषार देशमुख

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील फुलपाखरू उद्यान हिरवाईने नटले आहे. अल्हादायक वातावरणासह वेगवेगळ्या जातीची फुले व वनस्पती पाहण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पर्यटकांची गर्दी येथे होत आहे. 

ढेबेवाडी वनखात्याकडून  निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात आलेल्या भोसगाव फुलपाखरू उद्यानामध्ये अनेक जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या निसर्गरम्य ठिकाणावरून संपूर्ण ढेबेवाडी खोर्‍याचे विशाल रूप पर्यटकांना भुरळ घालते. एकीकडे वांग मराठवाडी धरणातील जलाशय आणि सभोवताली मोठी सागाची तसेच रायवळ झाडे. तर दुसरीकडे वाल्मिक पठारावरील उंच डोंगर रांगा व त्यावरून कोसळणारे धबधबे आणि घनदाट झाडीमधून वाट काढणारे पाण्याचे छोटेमोठे स्त्रोत पर्यटकांना भुरळ घालत आहेत.  

या उद्यानात जांबळ, कदंबा, पळस, खैर, सिसा, रायवळ, हेळा, आवळा, बांबू, खुळखुळा, हाडसांधरी, गुलमोहर, इलायती, चिंच अशा अनेक जातींची वृक्ष लागवड केली आहे. तसेच या पर्यटन उद्यानामध्ये जंगली प्राण्यांची, विविध जातींच्या फुलपाखरांची व पर्यावरणाची माहिती कम्युनिकेशन हॉलमध्ये दिली जाते. येथे येणार्‍या पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडीसह इतर खेळणी असल्याने लहान मुलांचे देखील चांगल्या प्रकारे मनोरंजन होवून अनेक प्रकारची माहिती मिळते. ब्रिटिश कालीन वनविश्राम ग्रह याच उद्यानाच्या पायथ्याला आहे, हे देखील पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.

ढेबेवाडीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या या पर्यटन स्थळाला पश्‍चिम महाराष्ट्रातील शाळा व कॉलेजनी भेटी दिल्या आहेत. शिवाय अनेक टीव्ही कलाकारांना, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना देखील या निसर्ग पर्यटनाची भुरळ पडली आहे. विकेंडची मजा लुटण्यासाठी अनेकांची पावले आपोआप भोसगांवच्या निसर्ग पर्यटन स्थळाकडे वळतात.  

भोसगांवच्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये वनखात्याकडून विविध प्रकारची वृक्ष लागवड केली आहे. तसेच याठिकाणी पर्यटकांना पाणी, बाथरूम, बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले असून वन्यप्राणी, फुलपाखरू आणि पर्यावरणाची सखोल माहिती वनखात्यामार्फत दिली जाते.   -डी. के. जाधव, वनपाल भोसगांव