Fri, May 29, 2020 18:31होमपेज › Satara › ‘जळक्या ऑईल’ची बाजारात तेजी

‘जळक्या ऑईल’ची बाजारात तेजी

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 10:48PM
खेड : अजय कदम  

वाहनांच्या बाहेर पडलेल्या जळक्या ऑॅईलच्या पुनर्विक्रीचा बाजार सातारा तालुका, शहर व उपनगरात तेजीत सुरू आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होत असली तरी फील्टर केलेले जळके ऑईल वापरल्यामुळे वाहनांच्या इंजीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे प्रदुषणातही वाढ होत आहे. 

दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी इंजिन ऑईलचा वापर केला जातो. बाजारात विविध प्रकारच्या वाहनांच्या इंजिनांसाठी उपलब्ध असणार्‍या ब्रँडेड ऑईलची विक्री सुमारे 90 पासून 950 रूपये पर्यंत प्रतिलिटर दराने केली जात असते, परंतु ज्यांना हे महागडे ऑईल खरेदी करणे परवडत नाही ते तुलनेने खुपच स्वस्त असणार्‍या लूज ऑईलकडे वळत आहेत.

गॅरेज तसेच सर्व्हिसिंग सेंटरमध्ये वाहनांच्या इंजिनमध्ये वापरून बाहेर काढलेल्या ऑईलला   ‘जळके ऑईल’ म्हणतात. हे जळके ऑईल फिल्टर्ड आणि रिफाईंड करण्यात आल्यानंतर लूज ऑईल बनून फक्त 50 ते 80 रूपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. लूज ऑईलमुळे ब्रँडेड ऑईलच्या विक्रीवर परिणाम होत आहे. 

काही वर्षांपूर्वी सातारा, कराड परिसरातील गॅरेजवर जळक्या तसेच अशुद्ध ऑईलच्या बेकायदेशीर साठ्यांवर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला होता. त्यानंतर या व्यवसायावर काही प्रमाणात निर्बंध आले होते. मात्र आज यात पुन्हा लाखो रूपयांची उलाढाल सुरू आहे.  लूज ऑईलचा उपयोग डांबरामध्ये भेसळ करण्यासाठीही केला जातो. या भेसळीमुळे ठेकेदाराच्या पैशाची बचत होत असली तरी त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा खालावत आहे. रस्त्याचे बांधकाम करणारे ठेकेदार हे लूज ऑईलचे मोठे ग्राहक असल्याचे आता पुढे येवू लागले आहे.

इंजिनचे मोठे नुकसान...

लूज ऑईल बाजारात विक्रीस आणण्यापूर्वी त्याच्यावर योग्य प्रकारची शुध्दीकरण प्रकीया केली नसेल तर इंजिनचे मोठे नुकसान होते. इंजिन ऑईल जितक्या वेळा वापरले जाते, तितकी त्याची ग्रॅव्हिटी कमी होत जाते. त्यामुळे वहानातून बाहेर पडणार्‍या धुरा मुळे हवेचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणावर होते.