Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Satara › माजगाव, चाफळमध्ये रस्त्यांवर जाळपोळ

माजगाव, चाफळमध्ये रस्त्यांवर जाळपोळ

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 11:02PMकराड : प्रतिनिधी 

कोपरखैरणे (नवी  मुंबई) येथील मराठा आंदोलनावेळी हत्या करण्यात आलेल्या खोनोली (ता. पाटण) येथील रोहन तोडकर (वय 19) याचा मृतदेह मुंबईतून घेऊन येणार्‍या रुग्णवाहिकेसह पोलिस ताफ्याला चाफळ परिसरात मराठा समाज बांधवांनी सुमारे चार तास अटकाव केला. तोडकर कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासह संशयितांचा शोध घेऊन कारवाईच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्र्यांनी आ. शंभुराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि जिल्हाधिकार्‍यांनी लेखी हमी दिल्यानंतरच रोहनचा मृतदेह गावाकडे नेण्यास मराठा समाज बांधवांनी परवानगी दिली.

बुधवारी नवी मुंबईसह राज्यभर मराठा आंदोलनाचा भडका उडाला होता. यावेळी आंदोलनात सहभागी रोहन तोडकर हा दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर गुरुवारी आंदोलनावेळी त्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत रोहनचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मुंबईहून खोनोली गावाकडे आणण्यात येत होता.

माजगाव जाळपोळ अन् ठिय्या दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील मोठा पोलिस फौजफाटा उंब्रजसह संपूर्ण चाफळ परिसरात तैनात करण्यात आला होता. माजगाव येथील मांड नदीच्या पुलावर टायर पेटवून टाकण्यात आला होता. तसेच एक लाकडी ओंडकाही रस्त्यावर टाकून वाहतूक बंद पाडण्यात आली होती. या मार्गावरून रुग्णवाहिका सकाळी नऊच्या सुमारास चाफळ परिसरात आल्यानंतर चाफळ खोनोली मार्गावर मराठा समाज बांधवांनी रुग्णवाहिकेसमोर ठिय्या मारला. यावेळी रुग्णवाहिकेसोबत पोलिसांच्या सहा ते सात गाड्या, जलद कृती दलाची तुकडीही होती; मात्र संतप्‍त मराठा समाज बांधवांचा आवेश पाहून पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह सातारा, कराड शहर, कराड तालुका तसेच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, आ. शंभूराज देसाई हेही सकाळी दहा वाजेपर्यंत चाफळमध्ये दाखल झाले होते. 

तोडकर कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी, एका नातेवाईकाला सरकारी नोकरी मिळावी, तसेच संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाईची जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी लेखी हमी देण्याची मागणी मराठा समाज बांधव करत होते. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासह पाटणचे प्रांताधिकारी, तहसिलदार हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही तासभरानंतरही तणावाची स्थिती कायमच होती. तर दुसरीकडे रोहन तोडकर याचे नातेवाईक हे आपल्या मागण्यांचे निवेदन तयार करून ते पोलिस अधिक्षकांकडे देणार होते. त्यामुळे या घडामोडीवर पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे लक्ष ठेऊन होते.

मुख्यमंत्र्यांचा फोन अन् हमी

दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री कार्यालयातून आ. शंभूराज देसाई यांच्या मोबाईलवर फोन आला आणि यावेळी स्वत: मुख्यमंत्री  यांनी आ. देसाई यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तोडकर कुटुंबियांना मदत देण्यासह संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाईची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आ. देसाई यांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय यांच्यासह स्थानिक लोकही उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आ. देसाई यांनी संतप्‍त जमावाच्या कानावर घातली. तसेच तोडकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. देसाई यांनी जमावाला दिली. मात्र त्यानंतरही जमावाचे समाधान होत नव्हते. मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकार्‍यांनीही तोडकर कुटुंबियांच्यावतीने तयार केलेले एक निवेदन जमावापुढे वाचून दाखवले. त्यानंतरही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी लेखी हमी देण्याच्या मागणीवर जमाव ठाम होता. आ. शंभूराज देसाई यांच्यासह अधिकार्‍यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री फसवतात, असे म्हणत जमाव रस्त्यावर चार तास बसून होता.

त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासाच्या कालावधीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी जमावापुढे प्रशासनाची भूमिका मांडली. तसेच तोडकर कुटुंबियांच्या मदतीसाठी सकारात्मक प्रस्ताव पाठवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काही वेळाने जिल्हाधिकार्‍यांनी लेखी हमी दिली. ही लेखी हमी मराठा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी वाचून दाखवल्यानंतर जमावाने रस्त्यावरून हटण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे चार तासांनी रूग्णवाहिका खोनोलीकडे रवाना झाल्याने तणाव निवळला.