होमपेज › Satara › निंबोडी रोडवर बैलगाड्यांच्या शर्यती

निंबोडी रोडवर बैलगाड्यांच्या शर्यती

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 11:01PMलोणंद : प्रतिनिधी

राज्यात बैलगाडी शर्यतींना बंदी असताना लोणंद येथील निंबोडी रोडवर सुमारे पन्नास हून अधिक बैलगाड्या तर पाचशेहून अधिक ग्रामस्थ जमा होऊन फाटी पध्दतीने दोन बैलगाड्यामध्ये बैलगाडी शर्यती झाल्या. रविवारी दिवसभर शर्यती लावून कायदा व नियमांची अक्षरश: पायमल्‍ली केली. यामध्ये लाखो रूपयांची उलाढाल झाली. या बैलगाडी शर्यतीमध्ये पुणे, मुंबई, सातारा जिल्ह्यातील बैलगाडी चालक मालक सहभागी झाले  होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे एकच पळापळ झाली. यामध्ये पोलिसांनी काही बैलगाडी चालकांना वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले. 

बैलगाडी शर्यतीला बंदी असताना लोणंदमधील निंबोरी रोडवर दिवसभर शर्यती  सुरू होत्या. त्यासाठी पाचशे मीटरचा दोन लेन चा ट्रॅक तयार केला होता. सातारा, पुणे, मुंबई या भागातून या बैलगाड्यांचे मालक आले होते. या शर्यतीला फाटी असे म्हणतात. यामध्ये दोन बैलगाडी मालक शर्यत लावून जो जिंकेल त्याला एक विशिष्ट रक्‍कम दिली जाते. त्यामध्ये लाखोचा व्हवहार केला जातो. दुपारी या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि सपोनि गिरिश दिघावकर यांनी कर्मचारी पाठवले. 

बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी पोलीस गाडी येताच सर्वाची एकच पळा पळ झाली. बैल, गाया, मोटारसायकल, चार चाकी वाहने रस्ता मिळेल तिकडे पळून गेले. पोलिसांना दोन बैलगाड्या मिळाल्या. त्यांना लोणंद पोलीस स्टेशनला आणले असता त्याचे वर केवळ बैल गाडीचा सराव केला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी फक्‍त प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बैलगाडी सराव करण्यासाठी सातारा, पुणे, मुंबई येथून मोठ्या संख्येने बैलगाड्या येतात हे विशेष म्हटले पाहिजे. सराव करताना बैल व मालक चालक, समर्थक यांच्या अंगावर गुलाल ही होता. अशाच प्रकारच्या शर्यती वांरवार कायद्यातील पळवाट शोधत अर्थपूर्ण तडजोडी करुन केल्या जात असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. तर पोलिसांनी बैलगाड्या पकडल्यानंतर त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली गेली. तरीही पोलीसांनी नाममात्र कारवाई केल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.