Sun, Mar 24, 2019 04:46होमपेज › Satara › बिल्डर्सचे कार्यालय फोडून 6 लाख लंपास

बिल्डर्सचे कार्यालय फोडून 6 लाख लंपास

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 11:57PMकराड : वार्ताहर

बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय देसाई यांचे कार्यालय फोडून चोरट्यांनी 6 लाखांची रोख रक्‍कम लंपास केली. तर याच कार्यालयाशेजारील इमारतीमध्ये असणार्‍या इंडसइंड बँकेची शाखाही चोरट्यांनी फोडली. मात्र, सुदैवाने तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. शनिवारी (दि. 30) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कायम रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत खळबळ उडाली.    

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे व वरीष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी श्‍वानपथक व ठसेतज्ञांना तात्काळ पाचारण केले. घटनेनंतर पोलिस दलाने या प्रकरणी दाखवलेल्या तत्परतेचे मात्र लोकांनी कौतूक केले.

कराड तालुक्यातील वाठार येथील दत्तात्रय हणमंतराव देसाई यांचा बांधकाम व्यवसायाबरोबरच पेट्रोल पंपही आहे. त्यांनी वाळू विक्रीतून जमा झालेली रक्कम तसेच मजुरांची दैनंदिन कामाची मजुरी, खरेदी केलेल्या बांधकाम साहित्याचे पेमेंट करण्यासाठी ठेवलेली रक्कम असे एकूण 5 लाख 90 हजार एवढी रक्कम आपल्या कार्यालयात आणुन ठेवली होती. या रक्कमेतून देसाई हे रविवारी मजुरांची मजुरी, बांधकाम साहित्याचे देणे देणार होते. मात्र, त्यापुर्वीच चोरट्यांनी ही सर्व रक्कम पळवली.

महामार्गालगत असलेली इंडसइंड बँकेची मलकापूर-कराड शाखा चोरट्यांनी फोडली. कटावणीच्या सहाय्याने शटरची कुलपे तोडून त्यांनी आत प्रवेश केला. कार्यालयातील सर्व ड्राव्हर्स व कपाटे फोडून त्यांनी हाताला काय लागतय का पाहिले. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे स्पष्ट झाले. कारण बँकेच्या शाखेत कोणतीही रोख रक्कम ठेवत नसल्याचे शाखाधिकार्‍याने पोलिसांना सांगितले. बँक आहे पण पैसा नाही, हे लक्षात आल्याने चोरट्यांनी शेजारच्या बिल्डर्सच्या कार्यालयात डल्ला मारण्याचे ठरविले. देसाई बिल्डर्सच्या कार्यालयातही चोरट्यांनी इंडसइंड बँकेच्या शाखेप्रमाणेच कुलपे तोडून आत प्रवेश केला व सर्व ड्राव्हर्स व कपाटे फोडून सुमारे सहा लाखांची रक्कम पळवली.

देसाई यांच्या कार्यालयात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा असतानाही काही तांत्रीक अडचणामुळे ती यंत्रणा नेमकी दोन दिवस बंद होती. तर इंडसइंड बँकेच्या शाखेत सी.सी.टी.व्ही. यंत्रणेसाठीचे सर्व साहित्य आणले मात्र जोडायचे राहिल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेज मिळाले असते तर तपासकामात चांगली मदत झाली असती असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीत काही संशयास्पद हालचाल सापडते का? याचाही पोलिस शोध घेत आहेत.

पुणे, सांगली, कोल्हापूरातही अशा घटना...

महामार्गालगत अशा चोरीच्या घटना सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातही घडल्या असल्याने तेथील चोरीप्रकरणातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज मागवून त्यादृष्टीनेही तपास सुरु केला असल्याचे पो.नि.गायकवाड यांनी सांगितले. ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रीय महामार्गालगत हे घटनास्थळ असल्याने पोलिस अधिकारी, त्यांच्या गाड्या व श्‍वानपथक पाहून नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती.