Thu, Jul 18, 2019 06:53होमपेज › Satara › व्यापार्‍यांच्या छाताडावर गुंडाची होणार बिल्डिंग

व्यापार्‍यांच्या छाताडावर गुंडाची होणार बिल्डिंग

Published On: May 31 2018 1:47AM | Last Updated: May 31 2018 1:47AMसातारा : प्रतिनिधी

चक्‍क एका गुंडाच्या पैशाच्या जोरावर दोन ‘भंगार’ बिल्डर सातार्‍यात मोक्याच्या ठिकाणी व्यापार्‍यांच्या छाताडावर बसून भव्यदिव्य इमला बांधण्यासाठी सरसावले असून, जागा खाली करण्यासाठी भाडेकरूंवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा सातार्‍यातील बाजारपेठेत सुरू आहे. एकीकडे पोलिस गुंडाच्या मुसक्या आवळत असताना या प्रकरणात ‘लाखोंची उड्डाणे’ झाल्याने खाकीतीलच काही जण सोईस्कर त्यांचे ‘लाड’ पुरवत असल्यानेही आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, सरड्याप्रमाणे ‘करडा’ रंग बदलणारा व भंगाराची ऐपत असणार्‍या ‘सौदी’कडून हा उच्छाद घातला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरातील राजवाडा ते पोवई नाकापर्यंत असणार्‍या जागेला कोटी मोलाचा भाव आहे. राजवाडा ते शेटे चौक या परिसरात एक मोठी जागा सध्या चर्चेत आली आहे. गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ या ठिकाणी व्यापारी भाडेकरू म्हणून राहत असून आपला संसार चालवत आहेत. ही जागा खास ‘चवी’साठीही प्रसिध्द म्हणून ओळखली जात होती. अनेक वर्षापासून या जागेत छोटी-मोठी दुकाने चालवली जात असताना गाळे बांधून देतो असे सांगून हातावरचे पोट असणार्‍यांकडून लाखो रुपये काढले गेले. मात्र अद्यापपर्यंत त्यांना गाळे बांधून दिले गेलेले नाहीत. दिवसभरात पोटाला चिमटा काढून पै पै जमवलेल्या या व्यापार्‍यांनी दिलेल्या पैशाची आतापर्यंत फसवणूकच झालेली आहे. अशी परिस्थिती असतानाच गेल्या चार दिवसांपासून मात्र याच जागेवरुन गहजब निर्माण झाला आहे.

सुमारे 15 व्यापारी  या भर वर्दळीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे गुजराण करत असताना या व्यवसायिकांना आता जागा खाली करण्यासाठी दमदाटी केली जात आहे. यावर व्यावसायिकांनी जागेला पैसे दिल्याचे सांगितल्यानंतर ते पैसे विसरुन जावा व जागा खाली करा, अन्यथा जीवे मारले जाल, अशी थेट धमकी दिली जात आहे. या सर्व प्रकारामुळे गरीब व मध्यमवर्गीय व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. कारण या जागेला आता ‘कॅश’ करण्यासाठी दोन बिल्डर उतरले आहेत. सामान्य व्यवसायिकांनी तेथून हाकलून देवून टोलेजंग इमारत बांधून कोट्यवधी रुपयांचा बाजार घालण्याचा पध्दतशीर डाव आखला जात आहे. 

या भंगारछाप बिल्डरच्या जोडगोळीला सातार्‍यातील एका गुंडामुळे ‘आवसान’ आले असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. याच जागेवरुन सध्या गुंडांच्या टोळ्या उतरल्या आहेत. या गुंडांने लुटालुट, सावकारी, धमकी देवून खंडणी उकळण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून केले आहेत. गुंडगिरीतून मिळवलेला पैसा आता जागेत गुंतवला जात असून त्यासाठी त्याने हाताशी दोन बिल्डर धरले असल्याचे समोर आले आहे. या कथित बिल्डरांची कुंडली हा स्वतंत्र विषय आहे. सध्या अनेक गुंड ‘सलाखों के पिछे’ आहेत. मात्र त्यांची माया अद्याप बाहेर असून त्याने पाय पसरल्याचेच हे उदाहरण मानले जात आहे. यामुळे हा सर्व प्रकार अतिशय गंभीर बनत चालला आहे. मोक्‍का लावला गेल्यानंतर त्या संशयितांच्या प्रॉपर्टीचे काय झाले? तपासी अधिकार्‍यांनी त्याचा किती तपास केला? आतापर्यंत किती प्रॉपर्टी जप्‍त केल्या? याचा हिशोब त्या त्या तपासी अधिकारी व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण टोळीच्या माध्यमातून गुंडांनी जमवलेली माया बिल्डरच्या माध्यमातून वर डोके काढत असेल तर ते सातारकरांसाठी घातक आहे.

सातार्‍यातील ही संबंधित जागा सुमारे 30 गुंठे असून त्यावर 20 व्यापारी गुजराण करत आहेत. बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपयांची ही जागा असून ती खाली करण्यासाठी गुंडाच्या टोळीने धुडगूस घातला आहे. भाडेकराराचा मार्ग सोपस्कार करुन हा घाट घालण्याचा प्रयत्न होत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे व्यापारी घाबरले असून त्यांच्या आयुष्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याच प्रकरणातून काही पिडीतांनी मोठ्या आशेने खाकीच्या एका विशेष विभागाला भेट देवून हकीकत सांगितली. मात्र याप्रकरणातील बिल्डरांनी त्या विशेष शाखेला ‘लक्ष्मी दर्शन’ घडवल्याने कारवाई करण्यासाठी त्या विभागानेही ‘मान टाकली’ आहे. यामुळे आता विश्‍वास कोणावर ठेवायचा? असा सवाल उपस्थित झाला असून लवकरच तक्रारदार एकत्र येवून पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणात छापाछापी करणारांची नावे ‘ओपन’ होण्याची शक्यता आहे.