सणबूर : वार्ताहर
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांचे शासनाने तत्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी शासनाकडे केली होती. शासनानेही प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तात्काळ करण्याचे आश्वासन दिले आहेे. वन विभागाने प्रकल्पग्रस्तांना पाटण तालुक्यातील उपलब्ध वनजमिनी पुनर्वसनाकरिता दाखविल्या आहेत त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी लवकरात लवकर पुनर्वसनाच्या जागा पसंत कराव्यात, असे आवाहन आ. शंभूराज देसाई यांनी केले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गांवाचे पुनर्वसन तात्काळ करणेसंदर्भात आ. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात बैठक आयोजीत झाली. बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, सहायक वनसरंक्षक कोयना सुरेश साळुंखे,सहाययक वनसरंक्षक चांदोली राजकुमार विधाते,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर, संजय पवार व प्रकल्पग्रस्त यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आ. देसाई यांनी व्याघ्र प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांकडून पुनर्वसनासंदर्भात माहिती घेवून वन्यजीव विभागाकडून या तिन्ही गावांच्या पुनर्वसना संदर्भात कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेतली.
यावेळी आ. देसाई म्हणाले,अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी पाटण तालुक्यातील मळे,कोळणे व पाथरपुंज ही तीन गांवे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये बाधित असून त्यांचे पुनर्वसन तात्काळ करणे गरजेचे असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावर पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठकही घेण्यात येणार आहे.त्याचा प्राथमिक आराखडा तयार करुन पुर्नवसनाकरीता आवश्यक असणा-या जागेसंदर्भात निर्णय घेणेकरीता प्रस्ताव शासनाकडे सादर होणे गरजेचे आहे.
वनविभागाकडून प्रकल्प ग्रस्तांनीही पाटण तालुक्यात वन विभागाने दाखविलेल्या वनविभागाच्या पुनर्वसनाच्या जागा पसंत कराव्यात. मळे येथील प्रकल्पग्रस्तांनी बहूले याठिकाणी पाथरपुंज येथील प्रकल्पग्रस्तांनी मारुलहवेली, सोनाईचीवाडी, मल्हारपेठ या विभागातील तर कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांनी कराड तालुक्यातील हेळगांव व खराडे येथील जागांना पसंती दिली असल्याचे प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात येत आहे. यातील काही ठिकाणी संबधित जागा दाखविलेल्या गांवानी या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता अद्यापही सहमती दर्शविली नाही त्यामुळे वनविभागाने इतर ठिकाणी कुठे जागा शिल्लक आहेत त्या दाखवाव्यात. व कसण्याकरीता किती जागा उपलब्ध करुन देता येतील याचा आराखडा तयार करावा. अशा सुचना आ.देसाई यांनी वरील अधिका-यांना केल्या.
tags : Sanbor,news,Budget, session ,Sahyadri, tiger, Reserve, Immediate, rehabilitation,three, villages,